विद्यार्थी होऊन प्रत्येक गोष्ट शिकण्याची वृत्ती तसेच कुतूहल निर्माण होणे महत्त्वाचे असते, असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. ‘स्वत:करिता आयुष्य जगायला शिकाल, तेव्हाच खरे आयुष्य जगाल’ असा सल्लाही त्यांनी दिला.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेत ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी त्यांच्या सहलेखिका दीपा देशमुख, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिक्षण मंडळाचे सदस्य नाना शिवले, माजी सदस्य गजानन चिंचवडे, संजय भोईर आदी उपस्थित होते. गोडबोले यांनी बालपणीच्या सोलापूरच्या आठवणी ते देशोदेशींचा प्रवास या दरम्यानच्या घडामोडी मोठय़ा रंजक पद्धतीने सांगितल्या. सामाजिक कार्यात असताना धुळ्यात दहा दिवस तुरुंगात काढल्याची कटू आठवणही त्यांनी सांगितली. आयआयटी हा आपल्या आयुष्यातील ‘टर्निग पॉइन्ट’ ठरल्याचे नमूद करत विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते व्यवस्थापकीय संचालकपदांचा प्रवास, तसेच लेखक झाल्यानंतर ‘बोर्डरूम’, ‘मुसाफिर’, ‘कॅनव्हास’, ‘जीनिअस’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘झुपुर्झा’, ‘मनात’, ‘लाइमलाइट’ आदी पुस्तकांच्या निर्मितीमागची प्रेरणा व अन्य गोष्टींची माहिती त्यांनी व्याख्यानात दिली. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, यासाठी मराठी पुस्तके लिहिण्याकडे वळलो. इतरांपेक्षा वेगळे वागल्यास आपल्याकडे प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे वैज्ञानिक, उद्योजक घडत नाहीत, असे विविध मुद्दे व निरीक्षणे त्यांनी व्याख्यानात मांडली. प्रास्तविक राजाभाऊ गोलांडे यांनी केले. वैशाली खोले यांनी सूत्रसंचालन केले. विजय नाईक यांनी आभार मानले.