सायकल रॅलीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वर्गातील सायकलपटू मित्राच्या स्मृतीसाठी ते शाळकरी विद्यार्थी एकत्र आले, वैयक्तिक खर्चासाठी मिळणाऱ्या ‘पॉकेटमनी’सह वर्गणी गोळा करून लाखभर रुपये त्यांनी उभे केले. सायकल रॅलीचे आयोजन केले, त्यात बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले. परिसरातील सोसायटय़ांमध्ये फिरून गोळा केलेल्या जुन्या सायकली दुरुस्त करून त्यांचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना केले. सुरक्षिततेसाठी हेल्मेटही दिले. असा हा मित्रप्रेमाचा हृद्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत निगडीत पार पडला.
ज्ञानप्रबोधिनी शाळेतील प्रथमेश संजय कुचे (वय १६) या दहावीतील सायकलपटू विद्यार्थ्यांचा १९ मार्चला अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे शाळेत शोककळा पसरली होती. बरेच दिवस प्रथमेशच्या सततच्या आठवणीने त्याचे मित्र अस्वस्थ होत होते. केवळ रडत बसण्यापेक्षा विधायक कामाद्वारे त्याची स्मृती जपण्याचा संकल्प त्यांनी केला. तो सायकलपटू होता आणि त्याचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाला होता, म्हणून त्याच्या स्मरणार्थ सायकल रॅलीचे आयोजन करण्याचे ठरवले. तसेच, गरजू विद्यार्थ्यांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्याचे त्यांनी ठरवले. या कामासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी त्यांनी वर्गणी काढली. सुरूवात स्वत:पासून केली, त्यात खाऊचे व खरेदीचे पैसे घातले. जवळपास एक लाख आठ हजार रुपये जमा झाले. त्यातून जमा झालेल्या ५० सायकली दुरुस्त करून घेण्यात आल्या. मॉडर्न संस्थेकडून १० नव्या सायकली देण्यात आल्या. सायकल रॅलीत ४०० हून अधिक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. डॉ. बबन डोळस यांच्या नेतृत्वाखाली सांगवीतील सायकल क्लबचे सदस्यही सहभागी झाले होते. प्रथमेशच्या वाढदिवशीच (७ मे) ज्ञानप्रबोधिनीच्या मातृमंदिर सभागृहात सायकलवाटपाचा हृद्य सोहळा झाला, त्यासाठी प्रथमेशच्या आई-वडिलांनीही मदत केली. या कार्यक्रमासाठी खासदार अमर साबळे, ज्ञानप्रबोधिनीचे उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, मॉडर्न शिक्षण संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्रथमेशचे वडील संजय, आई अंजली कुचे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना साबळे म्हणाले,की पुस्तकी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक बांधीलकी जपण्याचे शिक्षणही ज्ञानप्रबोधिनीने विद्यार्थ्यांना दिले. हा उपक्रम त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रथमेशचे मित्र असलेले व या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, त्या सम्यक साबळे, मानसी रानवडे, धीरज भामरे, सूरज बलदोटा यांनी या उपक्रमागचा हेतू सांगतानाच प्रथमेशच्या आठवणी सांगितल्या, तेव्हा अनेकांचा ऊर भरून आला. विद्यार्थ्यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, संदीप साकोरे यांनी केले.