पुण्यातील प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार

एकीकडे बालमानसशास्त्र जाणून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची धोरणे शिक्षण विभागात राबवली जात असताना विद्यार्थी शाळेत दंगा करून शाळेचे वातावरण बिघडवतो, असे कारण देत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शाळेने काढून टाकले आहे. पुण्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून कोणताही कायदा आणि नियमाची पत्रास ठेवली जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुण्यातील एका कॉन्व्हेंट शाळेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थी शिस्त बिघडवत असल्याचे कारण देऊन त्याला काढून टाकण्यात आले आहे. पालक शिक्षक संघाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांला काढून टाकण्यात आले. ‘तुमच्या मुलाची वागणूक दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तो उद्धटपणे वागतो. इतर पालकांकडून त्याच्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालक शिक्षक संघाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुलाचे हित लक्षात घेऊन त्याला यावर्षीच्या परीक्षेला बसू देण्यात येणार आहे,’ अशा आशयाचे पत्र शाळेने दिले आहे.

याबाबत पालक संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले, ‘हा विद्यार्थी शाळेत सातत्याने दंगा करतो. इतर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना तो मारतो. त्यामुळे त्याच्याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. हा विषय पालक शिक्षक संघाकडे आल्यानंतर एका मुलामुळे शाळेची शिस्त बिघडणे आणि इतर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणे योग्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.’

शाळेकडून विद्यार्थ्यांला जाणीवपूर्वक सातत्याने त्रास देण्यात येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली आहे. ‘विद्यार्थ्यांवर सातत्याने मानसिक दडपण आणण्यात येते. त्याच्या खोडय़ांबाबत यापूर्वी शाळेकडून तक्रारी येत नव्हत्या. जानेवारीत त्याच्या शिक्षकांनी आम्हाला बोलावून तुम्ही मुलाचा दाखला घेऊन जा असे सांगितले. त्यावेळी शाळेची चाचणी परीक्षा देण्यासही मुलाला परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर मी शिक्षकांना भेटून त्यांच्याशी बोलून मुलाला पुन्हा शाळेत पाठवले. पण त्याला दिवसभर वर्गाबाहेर उभे करण्यात आले. आता शाळा मुलाला वर्गात बसू देत नाही,’ असे सांगण्यात आले. याबाबत शाळेशी संपर्क साधला असता मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पालक शिक्षक संघाला शाळेतून  काढून टाकण्याचा अधिकार?

शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. असे असताना मुलाला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार पालक शिक्षक संघाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.