‘‘येत्या काळात ‘इस्रो’तर्फे जवळपास २१ उपग्रह प्रक्षेपित केले जाणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांमधून येणाऱ्या नवकल्पनांना एक व्यासपीठच उपलब्ध झाले आहे. अधिक टिकाऊ, उच्च क्षमता असलेले व कमी वजनाचे उपग्रह तयार करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे असून त्यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा,’’ असे मत ‘इस्रो’चे माजी गट संचालक डॉ. सुरेश नाईक यांनी व्यक्त केले.

विज्ञान भारती, मराठी विज्ञान परिषद, सृष्टिज्ञान मासिक व आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्यातर्फे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी)विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘स्वयम्’ या उपग्रहासंबंधी व्याख्यान व सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांच्या चमूसह त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मनीषा खळदकर, डॉ. नाईक, डॉ. प्रमोद काळे, विज्ञान भारतीचे कार्यकारी अध्यक्ष र. वि. कुलकर्णी, गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सृष्टिज्ञान मासिकाच्या कविता भालेराव या वेळी उपस्थित होते.

खळदकर म्हणाल्या,‘‘शालेय वयापासून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली तर त्यांच्याकडून अशी अनेक संशोधने होऊ शकतील. ‘स्वयम्’च्या प्रक्षेपणामुळे आमचा उत्साह वाढला असून लवकरच ‘स्वयम् २’ची तयारी सुरु केली जाईल.’’