दिवसाआड पाणी हा अपवाद वगळता राज्यातील दुष्काळाची झळ पुणेकरांना बसलेली नाही. त्यामुळे मराठवाडा या भागातील दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांचा शनिवारपासून (३० एप्रिल) दोन दिवसांचा दुष्काळी दौरा ‘यू थिंक’ या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
सध्याच्या बिकट परिस्थितीतही शहरी विद्यार्थ्यांना दुष्काळाची जाणीव होत नाही. हात धुवत असताना, दात घासताना, अंघोळ, गाडी धुण्यापासून ते हॉटेलमध्ये गेल्यावर मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होताना दिसून येते. पालक कित्येकदा आपल्या पाल्यांना पाणी बचतीविषयी सांगत असतात. पण, सर्वानाच काटकसरीने पाण्याचा वापर करणे जमतेच असे नाही. परंतु, दुष्काळी भागात नेऊन पाण्याची वानवा असलेल्या भागात लहान मुले, स्त्रिया हंडाभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर चालत जातात आणि उरापोटावर पाणी वाहून आणतात हे दृश्य अनुभवले तर युवकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडून येईल. पाण्याची बचत केली पाहिजे या जाणिवेतून ते जबाबदार नागरिक बनतील, या अपेक्षेने युवकांना दुष्काळाची जाणीव करून देण्यासाठी चैतन्य घाटे या युवकाने ‘यू थिंक’तर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होणारे युवक हे दुष्काळी भागात राहून स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका कशी करता येईल, हे अभ्यासणार आहेत.
शनिवारपासून (३० एप्रिल) दोन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्य़ाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या १४ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभागासाठी चैतन्य घाटे (मो.क्र. ८६०००२२३३३) याच्याशी दूरध्वनी, एसएमएस किंवा व्हॉट्स अॅपद्वारे संपर्क साधावा. प्रवास आणि निवासासाठी स्थानिक संस्थांची मदत घेण्यात येणार असल्यामुळे या दौऱ्यातील सहभागासाठी शुल्क नाही. पुण्यात परतल्यानंतर हे युवक समाज माध्यमे (सोशल मीडिया), सोसायटय़ांमध्ये जाऊन आणि मित्रांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे पाणी वाचविण्यासंदर्भात प्रबोधन करणार आहेत. दुष्काळाविषयी केवळ कोरडी सहानुभूती व्यक्त न करता मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेऊद्यात. पालकांनी न बोलताही त्यांच्यामध्ये बदल घडेल, असा विश्वास चैतन्य घाटे याने व्यक्त केला. या उपक्रमासाठी दुष्काळ मदत गटाचे मार्गदर्शक आणि यशदातील वरिष्ठ अधिकारी डॉ. सुमंत पांडे व राष्ट्रीय युवा पुरस्कारविजेते रवी घाटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.