जीवशास्त्र, खगोल आणि अवकाशशास्त्र क्षेत्रातील प्रमुख संस्था एकत्र येऊन अवकाशात कोणत्याही स्वरूपात जीवसृष्टी अस्तित्वात आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठीचा अभ्यास हाती घेणार आहेत. आताच्या काळात प्रगत उपकरणे उपलब्ध असल्याने अवकाशातील जीवसृष्टीबाबतचे गूढ उकलण्यास मदत होऊ  शकेल, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीए) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. योगेश शौचे यांचे ‘अवकाशातील जीवसृष्टीचा शोध-सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. सीएसआयआर एनसीएलतर्फे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘आधुनिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे अलीकडे वातावरणातील सूक्ष्मजीवांचा शोध घेता येणे शक्य आहे. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था (टीआयएफआर) आणि राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था (एनसीसीएस) यांच्यातर्फे पुढील वर्षी नवीन संशोधन प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे,’अशी माहिती डॉ. शौचे यांनी दिली. कोणत्याही प्रकारच्या जिवांना अनुकूल असा पृथ्वी हा एकमेव ज्ञात ग्रह आहे. उष्णता, थंडी किंवा आम्लकारी परिस्थितीमध्ये टिकू शकणारे जीव आतापर्यंत पृथ्वीवर आढळून आले आहेत. त्यामुळे अवकाशातील प्रतिकूल वातावरणातही टिकू शकणारे सूक्ष्मजीव असू शकतात. इतर काही ग्रहांचा विचार करता सूक्ष्मजीवसृष्टीचा उगम हा कार्बन आधारित नसू शकतो. त्यामुळे पृथ्वीसारख्या परिस्थितीची तेथे अपेक्षा करता येणार नाही. असे असले, तरी कुठल्याही जीवसृष्टीसाठी पाण्याचे अस्तित्व हे महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यामुळेच जैवरासायनिक क्रिया घडून सूक्ष्मजीव जिवंत राहू शकतात, असेही डॉ. शौचे यांनी स्पष्ट केले.

विज्ञान महोत्सवात चार संस्थांचा सहभाग

केंद्र शासनाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान भारती (विभा) यांच्यातर्फे ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कोलकाता येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात चार प्रमुख विज्ञान संस्था सहभागी होणार आहेत. त्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आघारकर संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट (आयआयटीएम), राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था (एनसीसीएस) या संस्थांचा सहभाग आहे.