News Flash

मुलाखत : भरपूर हसा आणि निरोगी राहा!

१३ मार्च १९९५ रोडी मुंबईमध्ये इंटरनॅशनल लाफ्टर क्लब या पहिल्या हास्य क्लबची स्थापना केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

संपूर्ण जगभरात मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हास्य दिन साजरा केला जातो. चैतन्य हास्ययोग मंडळातर्फे रविवारी (६ मे) लाल महाल येथे सकाळी साडेसहा ते आठ या वेळात जागतिक हास्य दिन साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने चैतन्य हास्य-योग मंडळाचे संस्थापक समन्वयक सुभाष दुगल यांच्याशी साधलेला संवाद.

* हास्याचे जीवनामध्ये महत्त्व काय?

– ‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा’ हे महंमद रफी यांच्या स्वरांतील लोकप्रिय बालगीत खरं तर, रुसलेल्या मुलांच्या गालावर हास्य उमटविण्यासाठी आहे. पण, सध्याच्या ताणतणावाच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात माणूस हास्य ही नैसर्गिक देणगी विसरला आहे. परमेश्वराने फक्त माणसालाच हास्याची देणगी दिली आहे. इतर कोणताही प्राणी हसू शकत नाही. त्यामुळे हसण्याचे फायदे केवळ माणसालाच मिळतात. हसल्यामुळे माणसाच्या शरीरात ‘इंडोर्फिन’ नावाचे रसायन तयार होते आणि ते सर्व शरीरभर पसरते. इंडोर्फिन हे रसायन एरवी तयार होत नाही. फक्त हसल्यानंतरच ते शरीरात तयार होते. त्यामुळे माणसाने सतत हसतमुख आणि प्रसन्न राहावे. आपले आरोग्य निरोगी ठेवावे.

* हास्याचे फायदे कोणते आहेत?

– हास्यामुळे शरीरातील प्राणवायूची पातळी वाढते. संवेदना निर्माण करणारी मेंदूतील ‘इंडोर्फिन’ हार्मोन्समुक्त होतात. त्यामुळे आपण तंदुरुस्त असल्याची जाणीव होते. दररोज हास्योपचार केल्यामुळे आपण दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने होतो. माणसाचा आत्मविश्वास वाढतो. नेतृत्वगुणांचा विकास होतो. सामंजस्य आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. हास्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. वाढीव रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, चिडचिड, निद्रानाश, खिन्नता, अ‍ॅलर्जी, दमा, अर्धशिशी, स्नायूदाह, मणकेदुखी (स्पाँडिलायसिस) आणि पाठदुखी या व्याधी कमी होण्यास मदत होते. यकृताचे कार्य जोमाने चालते आणि मानसिक ताण कमी होतो.

*  हास्य क्लबची स्थापना कधी झाली?

– डॉ. मदन कटारिया यांनी १३ मार्च १९९५ रोडी मुंबईमध्ये इंटरनॅशनल लाफ्टर क्लब या पहिल्या हास्य क्लबची स्थापना केली. तेव्हापासून गेली २३ वर्षे वेगवेगळ्या संस्थांतर्फे हास्य क्लब स्थापन होऊ लागले. त्यापैकी एक म्हणजे चैतन्य हास्य योग मंडळ हे एक आहे. चैतन्य हास्य योग मंडळाची पहिली शाखा ५ सप्टेंबर १९९७ रोजी संभाजी उद्यानात सुरू झाली. त्यात अरुण पाठक, यशवंत भागवत, अशोक मुरुडकर, कै. वामनराव लवाटे, माधुरी पाठक यांच्यासह काही सहकारी सुरुवातीला व्यायाम करीत असत. हळूहळू ही संख्या वाढून व्यायाम करणाऱ्यांची संख्या शंभरावर गेली. लोकांना आपापल्या ठिकाणी व्यायाम करणे सोयीचे व्हावे म्हणून चैतन्य हास्य योग मंडळाच्या शाखा सुरू करण्यात आल्या. १७ मे २००१ रोजी शनिवारवाडय़ासमोरील हिरवळीवर चैतन्य हास्य योग मंडळाची १८ वी शाखा सुरू झाली. पुणे महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये शाखा सुरू झाल्या. १० एप्रिल २००५ रोजी बारामती येथे चैतन्य हास्य योग मंडळाची शंभरावी शाखा सुरू झाली.

* चैतन्य हास्य योग मंडळाचे वैशिष्टय़ काय?

– मंडळाचे सभासद होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोणताही धर्मभेद, जातिभेद किंवा वर्गभेद नाही. तसेच कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधील नाही. व्यायामाची आवड असणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीने मग ती स्त्री असो किंवा पुरुष सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात एकत्र यावे. आपल्याला झेपेल, पेलवेल आणि असेल तेवढा वेळ व्यायाम करावा. कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्यामुळे सभासदाच्या मनाला दडपण नसते. त्यामुळे लोक आनंदाने सहभागी होतात आणि व्यायाम व हास्य योगासने करून आनंदाने घरी जातात.

* सकाळच्या तासभरात एकत्र येऊन काय करता?

– सकाळी साडेसहा वाजता एकत्र जमल्यानंतर पहिल्यांदा शंभर टाळ्या वाजवतो. टाळ्यांच्या निनादाने हाताच्या पाचही बोटांना चांगला व्यायाम होतो. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना म्हटली जाते. शरीराच्या सर्व अंगाला व्यायाम व्हावा यासाठी आपण शाळेमध्ये करतो तशी २० मिनिटे कवायत केली जाते. त्यानंतर योगासने आणि हास्याचे वेगवेगळे प्रकार सादर केले जातात. एकही दिवस सुट्टी नसते. वर्षांतील ३६५ दिवस हास्य योग मंडळ कार्यरत असते. सर्व जण आपुलकीने एकत्र येतात आणि व्यायाम करतात. एखादी व्यक्ती गैरहजर असेल तर ती का आली नाही किंवा आजारी असेल तर दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष भेटून चौकशी केली जाते.

*  केवळ व्यायामापुरतेच मंडळ कार्यरत आहे का?

– नाही. आम्ही सामाजिक कामामध्येही आपल्या परीने खारीचा वाटा उचलतो. २००१ पासून दरवर्षी आमच्या मंडळातर्फे दीपोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी पुण्यातील नामवंत व्यक्तींकडून आर्थिक साहाय्य घेतले जाते. त्यामुळे चैतन्य हास्य योग मंडळ संस्थेची १ ऑक्टोबर २००३ रोजी नोंदणी करण्यात आली. दरवर्षी आषाढी वारीत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर रेड स्वस्तिक फाउंडेशनतर्फे दोन रुग्णवाहिका, डॉक्टर आणि नर्सची नेमणूक करण्यात येते. लिज्जत पापड संस्थेचे सुरेश कोते यांच्याबरोबर आमच्या संस्थेचे जयसिंगराव पवार, पंजाबराव देशमुख, गोसावी, शमा भावसार हे वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करतात. आपद्ग्रस्तांसाठी मदत करण्याचे कार्य संस्था गेल्या सहा वर्षांपासून करीत आहे. गडचिरोली भागातील आदिवासींसाठी गरम कपडे गोळा करून पाठविणे, कारगील युद्धाच्या वेळी निधी संकलित करून पाठविणे अशी कामे केली आहेत. त्सुनामीग्रस्तांसाठी संस्थेने सर्व शाखांमधून २००५ मध्ये २८ हजार ८३७ रुपयांचा निधी जमा केला होता. २०१५ मध्ये संस्थेच्या सभासदांनी गोळा केलेला ५० हजार रुपयांचा निधी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या दुष्काळग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या नाम फाउंडेशनला देण्यात आला.

* मंडळाचे यापुढचे उद्दिष्ट काय?

– हास्य क्लब या उपक्रमाकडे युवा वर्ग आकृष्ट होताना दिसत नाही. त्यासाठी मे महिन्यात परीक्षा संपल्यावर प्रत्येक शाखेत विद्यार्थ्यांनी सुटीच्या कालावधीत तरी यावे आणि या वयातच त्यांना व्यायामाची गोडी लागावी, यासाठी चैतन्य हास्य योग मंडळाची यंत्रणा कामाला लागली आहे. सहकार्याध्यक्ष प्रभाकर घुले, खजिनदार विष्णू रत्नपारखी, समन्वयक प्रकाश आंब्रे यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती सर्व शाखांना भेट देऊन तरुणांना मंडळामध्ये येण्यासाठी आमंत्रित करणार आहे.

मुलाखत – विद्याधर कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:36 am

Web Title: subhas dugal interview on occasion of world laughter day
Next Stories
1 नाटक बिटक : अनुभवी कलाकारांच्या नव्या कलाकृती
2 भाडेकराराची ऑनलाइन नोंदणी अत्यल्प दरात
3 पिंपरीत साबण व्यापाऱ्याची हत्या
Just Now!
X