महापालिकेचे सभागृहनेता सुभाष जगताप यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाकडून आता सभागृहनेता या पदावर कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता असून जगताप गेली चार वर्षे सभागृहनेता म्हणून काम पहात होते. चार वर्षांत शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची संधी या पदाच्या माध्यमातून मिळाली, असे मनोगत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सभागृहनेता बदलाची चर्चा गेले काही महिने राष्ट्रवादीमध्ये होती. सुभाष जगताप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा शुक्रवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे दिला. या पदासाठी माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि शंकर केमसे, तसेच आणखी एक-दोन नावे चर्चेत असून त्यांच्यापैकी कोणालातरी संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होते.
पत्रकार परिषदेत जगताप यांनी त्यांच्या चार वर्षांतील कामांचा आढावा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सभागृहनेता या पदावर काम करण्याची सलग दोन वेळा संधी मिळाली. या काळात महापालिकेच्या दृष्टीने तसेच शहरविकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. शहराचा र्सवकष वाहतूक आराखडा तयार झाला, तसेच मेट्रोच्या दोन मार्गाची मंजुरी शासनाने दिली, भाषा संवर्धन समितीची स्थापनाही याच काळात झाली. असे विविध महत्त्वाचे विषय मार्गी लागले, असे ते म्हणाले.
शहरातील विविध नाटय़गृह, तसेच कलादालने यांचाही प्रारंभ या काळात झाला. शहरातील अनेक उड्डाणपुलांची कामेही मार्गी लागली असून काही पादचारी पुलांचे कामही सुरू झाले आहे. शहरातील अनेक विकासकामे, तसेच प्रकल्पांचीही कामे या काळात मार्गी लागली आहेत. महापालिकेतील सेवाप्रवेश नियमावलीला या काळात मान्यता मिळाली, असेही जगताप यांनी सांगितले.