सीएनजी किट बसवून घेणाऱ्या रिक्षाचालकांना महापालिका यंदाही अनुदान देणार असून उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतुदीनुसार यंदा एक हजार ६६० रिक्षांना अनुदान दिले जाणार आहे. सीएनजी वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना गेली दोन वर्षे राबवली जात आहे. या योजनेत प्रत्येक रिक्षाचालकाला १२ हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जातील.
शहरातील प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षाला सीएनजी किट बसवून घ्यावे, असा प्रस्ताव गेली काही वर्षे चर्चेत होता. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. रिक्षाचालकांनी या योजनेला मोठय़ा संख्येने प्रतिसाद द्यावा यासाठी रिक्षांना थेट अनुदान देण्याची योजना गेली दोन वर्षे राबवली जात असून गेल्या वर्षी या योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात १२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातून १० हजार रिक्षाचालकांनी किट बसवून घ्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी अर्ज आले.
यंदा या योजनेसाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून एक हजार ६६० रिक्षांना सीएनजी किटसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. उर्वरित रक्कम रिक्षाचालकाने भरणे अपेक्षित आहे. या योजनेला मंजुरी मागणारा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला असून मंगळवारी (१६ जुलै) होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय होईल. रिक्षाचालकांनी किट बसवण्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांची पडताळणी करून हे अनुदान दिले जाते.