शास्त्रज्ञांचे संशोधन; अवकाश हवामान अंदाजासाठी उपयुक्त

राष्ट्रीय रेडिओ भौतिकी संशोधन केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञ डॉ. दिव्य ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने सूर्याची आजवरची सर्वात सखोल प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले आहे. अवकाश हवामान अंदाजांसाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल.

सर्वात तेजस्वी घटक असलेल्या सूर्याचा शास्त्रज्ञ अनेक वर्षे अभ्यास करीत आहेत. मात्र, दळणवळण आणि संवादासाठीचे उपग्रह, वीजपुरवठा यावर परिणाम करणारे स्फोट सूर्यामध्ये कधी आणि किती होतात अशा अनेक गोष्टी अद्याप गूढच राहिल्या आहेत. अतुल मोहन, सुरजित मंडल यांच्यासह डॉ. ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने वेगवेगळ्या तरंगलांबीच्या रेडिओलहरी वापरून सूर्याची ही प्रतिमा तयार केली. ऑस्ट्रेलियातील  ‘मर्चिसन वाइडफिल्ड अ‍ॅरे’द्वारे या रेडिओ दुर्बिणीने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे.  डॉ. ओबेरॉय यांच्यासह रोहित शर्मा, अतुल मोहन, सुरजित मंडल यांनी ‘ऑटोमेटेड इमेजिंग रूटीन फॉर कॉम्पॅक्ट अ‍ॅरेज फॉर द रेडिओ सन’ किंवा ‘एअरकर्स’ नामक ‘सॉफ्टवेअर पॅकेज’ विकसित केले.

एअरकर्सचा वापर करून एका स्वतंत्र प्रकल्पात या चमूने पहिल्यांदा अर्ध्या सेकंदात शेकडो कंप्रतेच्या रेडिओलहरींच्या मदतीने सूर्याची  अधिक सुस्पष्ट आणि सखोल प्रतिमा तयार केली. यात प्रति तास सुमारे दहा दशलक्ष प्रतिमा तयार  करण्यात आल्या असून  या उच्च विवर्तन  प्रतिमेमुळे मोठय़ा भागातील कमजोर स्फोटही शोधणे शक्य झाले. या दोन्ही संशोधनांवरील निबंध अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध होतील.

या संशोधनासाठी मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनी विद्यापीठ, कर्टिन विद्यापीठ या संस्थांतील कॉलिन लोन्सडेल, लियोनिद बेंकेविच, जॉन मॉर्गन, इव्हर केर्न्‍स, मेगन क्रॉली यांनी योगदान दिले.

पूर्वी हिमवर्षांवाच्या टिपांसारख्या केवळ अति चमकदार ज्वाला पाहिल्या जात होत्या. अवकाश हवामान समजावून घेण्यासाठी आवश्यक गोष्टी अतिक्षीण टोकाला लपलेल्या आहेत. या शोधाने सौर वातावरणातील खोलवर चालणाऱ्या नवीन घटना पाहता येतील.

अतुल मोहन, सुरजित मंडल