तरूणांनी न्यूनगंड न बाळगता आपले सुप्त गुण ओळखून काम करत रहावे, आळशीपणा करू नये. थोर व यशस्वी उद्योजकांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी चिंचवड येथे बोलताना केले. स्त्रियांना उद्योगक्षेत्रातील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक परिषदेच्या वतीने यशस्वी उद्योजकांचा डॉ. शेजवलकरांच्या हस्ते सत्कार झाला, तेव्हा ते बोलत होते. टाटा मोटर्सचे निवृत्त सरव्यवस्थापक मनोहर पारळकर, माजी कामगार आयुक्त टी.जी.चोळके, परिषदेचे अध्यक्ष कैलास आवटे आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थीमध्ये राजेंद्र शिंदे, नागेश वसटकर, डॉ. कविता गंगावणे, सुदाम झराड, महेंद्र वाघेरे, निवृत्ती नेवाळे यांचा समावेश आहे.
डॉ. शेजवलकर म्हणाले,की देश उद्योगप्रधान बनवणे व पुरेसा रोजगार उपलब्ध करणे ही आपल्या देशासमोरची मोठी आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी अधिकाधिक स्वनिर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योजकांनी करावा. देशाचा आधारस्तंभ तरूण पिढी आहे, ती ध्येयवादी असली तर देशाची प्रगती होईल. समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व ओळखले पाहिजे. सूत्रसंचालन चंद्रकांत वानखेडे यांनी केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.