रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश

दिवसभर काम करायचे, घराला हातभार लावायचा आणि त्याचवेळी चिकाटीने मोठे होण्याचे स्वप्नही बाळगायचे, हेच सूत्र घेऊन काम करणाऱ्या रात्रशाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत यश मिळवले आहे. दिवसभराच्या कामातून मिळणाऱ्या अनुभवाचाही परीक्षेत उपयोग झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

शहरातील रात्रशाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. सकाळी उठून अभ्यास करायचा, त्यानंतर दिवसभर काम आणि त्यानंतर रात्री महाविद्यालयात शिक्षण असा या विद्यार्थ्यांचा दिनक्रम. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी हे विद्यार्थी दिवसभर विविध ठिकाणी कामे करतात. स्वत:च्या शिक्षणाचा खर्चही यातून भागवतात. काम करत असताना मिळणाऱ्या अनुभवातून परीक्षेचाही अभ्यास होत असतो. अकाऊंट्स, बुक किपिंग हे विषय रात्री महाविद्यालयांत शिकताना त्यांचे व्यवहारातील ज्ञान दिवसभर काम करताना मिळते. त्याचा अभ्यास करताना फायदाच झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पूना नाईट स्कूलमध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणाऱ्या सुनील ढेबे याला ८३.६९ टक्के मिळाले आहेत. मूळचा वाई तालुक्यातील सुनील शिक्षणासाठी पुण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो ऑफिस बॉय म्हणून काम करतो. वकील होण्याचे त्याचे स्वप्न आहे. ‘मिळणारा पगार मी घरी देतो आणि त्यातील काही भाग मी शुल्क, पुस्तके यांसाठी खर्च करतो. घरात शिक्षणाचे वातावरण नाही. बारावी परीक्षेच्या महत्त्वाचीही घरच्यांना कल्पना नाही, मात्र मी पुढे शिकणार आहे,’ असे सुनील याने सांगितले.

वेल्हे तालुक्यातील घईसर गावातून आलेल्या तानाजी धिंडाळे याला ७९.३८ टक्के मिळाले आहेत. तुळशीबागेतील एका दागिन्यांच्या दुकानात तानाजी विक्रेता म्हणून काम करतो. त्याला सीए करायचे आहे. ‘मी पुण्यात माझ्या काकांकडे राहातो. मला एक मोठा भाऊ आहे. तो विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे (एमएससी) शिक्षण घेतो आहे.

काका मला शिकण्यासाठी खूप मदत करतात. घरातल्यांच्या प्रोत्साहनामुळेच अधिक शिकण्याची इच्छा आहे,’ असे तानाजी याने सांगितले. शहरातील रात्र शाळांपैकी पूना नाईट स्कूलचा निकाल ७८ टक्के लागला आहे. सेंट व्हिन्सेंट नाईट स्कूलचा निकाल ८४ टक्के, तर अत्रे रात्रशाळेचा निकाल ६५.९६ टक्के लागला आहे.