अनेकविध क्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावत आहे. महिलांचे कर्तृत्वही सिद्ध होत आहे. खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवण्यापासून ते संशोधन आणि नवनिर्मितीपर्यंत विविध क्षेत्रात चमकत असलेल्या काही महिलांच्या कार्याची ही ओळख करून देत आहेत भक्ती बिसुरे. शहरातील धकाधकीच्या आयुष्यात नाश्ता, मधल्या वेळचे खाणे किंवा अगदी जेवणासाठीही अनेकजण ‘ऑनलाईन’ मागवलेल्या जेवणावर अवलंबून असतात. मोबाईल अ‍ॅपवरून मागवलेले जेवण घेऊन येणारे ‘डिलिव्हरी बॉय’आपण सगळीकडे पाहतो, मात्र शहराच्या अनेक भागात ग्राहकांपर्यंत तयार पदार्थ किंवा जेवण पोहोचवण्यासाठी ‘डिलिव्हरी गर्ल्स’ही येताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांची जेवणाची वेळ सांभाळण्याच्या वेगात आता महिलांनीही आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

मोबाईल अ‍ॅपवरून मागवलेले जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘स्विगी’ या कंपनीने पुण्यात सतरा महिलांची ‘डिलिव्हरी रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून नियुक्ती केली आहे. देशातील विविध शहरांमधील मिळून ही संख्या दोनशे एवढी आहे. ‘स्विगी’साठी कार्यालयीन कामात अनेक महिला आहेत, मात्र महिलांसाठी समान संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘डिलिव्हरी रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेले आठ महिने ‘स्विगी’बरोबर काम करत असलेल्या लुईस सूर्यवंशी सांगतात, खासगी नोकरी करताना स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होत नसे. ‘स्विगी’साठी सकाळी नऊ  ते संध्याकाळी सहा या वेळेत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर वाचन, वैयक्तिक आवडी निवडी आणि कुटुंबासाठी वेळ देणे शक्य झाले आहे. ऑनलाईन जेवण मागवल्यानंतर ते घेऊन येणारे ‘डिलिव्हरी बॉय’ पाहण्याची सवय असलेले ग्राहक मला बघून चकित होत असत. मी हे काम करत असल्याबद्दल त्यांच्याकडून माझे कौतुकही करण्यात आले. हे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शहर, परिसर याबद्दल माहिती मिळाली शिवाय माझा आत्मविश्वासदेखील वाढला.

मोनिका उपाध्याय गेले चार महिने ‘स्विगी’ बरोबर काम करत आहेत. त्या म्हणाल्या, गृहिणी म्हणून आपण काहीतरी काम करून पैसे मिळवावे असे वाटत असे. हे काम करून बघावे असे ठरवले आणि त्यात रमले. दुचाकी चालवता येत असलेल्या महिलांसाठी घर आणि वैयक्तिक जबाबदारी सांभाळून करण्यासाठी हे काम योग्य आहे. ग्राहकांकडून अत्यंत मानाची वागणूक मिळते.

शुभांगी लोणकर म्हणाल्या, पहिली ऑर्डर पोहोचवण्यासाठी एका कुटुंबाच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी प्रेमाने स्वागत केले. चहाचा आग्रह केला. अनेक ग्राहकांनी कौतुक करण्यासाठी माझ्याबरोबर सेल्फी काढला आहे. हे काम करण्यास सुरुवात केल्यापासून स्वावलंबी झाल्याने आत्मविश्वास उंचावला आहे.