‘सु-दर्शन रंगमंच’ दोन महिन्यांपासून बंद; रस्तेकामे लवकर पूर्ण करण्याची मागणी
सिमेंट रस्ता करण्याचे काम रेंगाळल्याचा फटका प्रायोगिक रंगभूमीला बसला आहे. एप्रिल आणि मे हे सुट्टय़ांचे दोन महिने नाटय़चळवळीला पोषक असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून ‘सु-दर्शन रंगमंच’ येथे एकही नाटय़प्रयोग होऊ शकलेला नाही. ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या पुण्यनगरीतील विकासकामे अनेकविध घटकांना फटका देत असल्याचा अनुभव या निमित्ताने येत आहे.
भरत नाटय़ मंदिर हे जसे रंगकर्मीचे भेटण्याचे ठिकाण तसे शनिवार पेठ येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर संस्थेचे सु-दर्शन रंगमंच हे प्रायोगिक चळवळीतील नाटय़कर्मीचे माहेरघर. केळकर रस्त्यावरील लक्ष्मी क्रीडा मंदिर हे छोटेखानी सभागृह काळाच्या ओघात गेले. ही कसर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अहल्यादेवी प्रशालेजवळील सु-दर्शन रंगमंचाने भरून काढली. याच रंगमंचावर अलिकडच्या काळात प्रायोगिक नाटय़चळवळ रुजली आणि वाढली. मर्यादित आसनक्षमता असलेल्या या रंगमंचावरून सादर झालेल्या काही नाटकांनी तर पुढे व्यावसायिक रंगभूमीवरही लोकप्रिय होण्याचे भाग्य अनुभवले आहे. मात्र, यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे या रंगमंचाने जणू दुष्काळ अनुभवला.
सिमेंटचा रस्ता करण्याच्या येथील कामाला १५ मार्चपासून सुरुवात झाली. तेव्हापासून हा रंगमंच नाटकांसाठी बंदच ठेवण्यात आल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्यामुळे येथे वाहने आणता येत नाहीत. लोकांना पायी चालणे मुश्कील झाले असून नाटकाचा ‘सेट’ कसा आणणार हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच हा रंगमंच बंद ठेवण्याखेरीज दुसरा पर्यायच उरला नाही. ज्या नाटय़संस्था नाटकाच्या बुकिंगसाठी आल्या त्यांना या परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे येथे नाटय़प्रयोग करायला कोणी धजावले नाही. नाटय़गृह बंद असल्यामुळे रंगकाम करायचे ठरविले होते. मात्र, सध्या पाणीटंचाई सुरू असल्यामुळे रंगरंगोटीचे कामही स्थगित ठेवले असल्याचे दामले यांनी सांगितले.
अहल्यादेवी प्रशालेकडून मेहुणपुरा रस्त्याकडे जाण्याच्या मार्गावर सु-दर्शन रंगमंच, बँक ऑफ महाराष्ट्रची शनिवार पेठ शाखा लागते. ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीचे पैसे काढण्यासाठी बँकेत येणे तापदायक झाले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून किती दिवसांत ते पूर्ण होणार हे कोणीच सांगत नाही, असे शुभांगी दामले म्हणाल्या.
विद्याधर कुलकर्णी