राज्यात नोंदणीकृत २०२ साखर कारखान्यांपैकी १४८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. उपलब्ध ऊस आणि गाळपाची क्षमता लक्षात घेता या वर्षी गाळप हंगाम १६० दिवसांहून अधिक चालेल अशी शक्यता आहे. दरवर्षी १२० दिवसांपर्यंत गाळप हंगाम चालतो. एप्रिलअखेपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील. या वर्षी देशात ३२० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज असून साखरेचा वापर लक्षात घेता ७० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, सांगली भागात या वर्षी तोडणीसाठी पुरेसे कामगार उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नियोजन करून पूर्ण उसाचे गाळप होईल असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. राज्याचा विचार करता गेल्या वर्षीची ६२ लाख टन साखर शिल्लक असताना त्यामध्ये यंदा ९९ लाख टन साखरेची भर पडणार आहे. परिणामी हे उत्पादन अतिरिक्त होणार असल्याचा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त के ला. राज्याला प्रतिवर्षी खाणे आणि वाणिज्यिक वापर अशा ३५ लाख टन साखरेची गरज असते. सध्या १४८ कारखाने सुरू झाले असून त्यातून १३० लाख टन गाळप झाले आहे, तर १०९ लाख क्विं टल साखर तयार झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर पडल्याने साखर निर्यात ठप्प आहे. दरावर सरकारचे बंधन असल्याने अतिरिक्त उत्पादन झाले तरीही साखरेचे भाव कमी होणार नाहीत, असे गायकवाड यांनी सांगितले.

सध्या तोडणी यंत्रणा पुरेशी नसल्याने क्षमतेपेक्षा कमी गाळप सुरू आहे. करोनामुळे ऊसतोडणी मजुरांची संख्या तुलनेने कमी आहे. सहा लाख मजूर तोडणीसाठी बाहेर पडतील असा अंदाज होता. मात्र, तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात मजूर उपलब्ध नसल्याने हार्वेस्टरच्या आधारे तोडणीवर जोर दिला जात आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडल्यामुळे त्यांचे छोटे तुकडे होतात. साखर कारखान्यातील ऊस वाहून नेणारी गव्हाण मोळी वाहतुकीच्या दृष्टीने बनविलेल्या आहेत. त्यामुळे काही उसाची टिपरे आणि काही मोळया असा ऊस गाळपासाठी पाठवावा लागतो. परिणामी प्रतिदिन गाळप क्षमता आणि तोडणी याचे सूत्र जुळत नसल्याचे दिसून येत आहे.

या अनुषंगाने बोलताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, ‘साधारणपणे १२० दिवसांपर्यंत गाळप हंगाम संपत असे. या वर्षी तो १६० दिवसाचा असेल. एप्रिलपर्यंत मराठवाडा, सोलापूर या भागातील ऊस संपेल. गुऱ्हाळाकडे जाणारा ऊस आणि उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला अजूनही मर्यादा असल्याने या वर्षी साखर अतिरिक्त ठरेल. अजून तरी ऊस गाळपाअभावी शिल्लक राहील, असे वाटत नाही.’

आतापर्यंतच्या गाळपातून पूर्वीची ६० ते ७० लाख टन साखर शिल्लक आहे. या वर्षी ३२० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. दरवर्षी साखरेचा वापर २५० लाख मेट्रीक टनाचा आहे. त्यामुळे या वर्षी साखर अधिक शिल्लक राहील. साखर उत्पादन वाढेल तसेच हंगाम कडक उन्हाळयातही सुरू राहील, असा अंदाज आहे.

‘इथेनॉल निर्मितीमध्ये अधिकाधिक साखर कारखान्यांनी वळावे यासाठी प्रयत्न केले होते. त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे हंगाम लांबेल आणि साखर साठाही वाढेल अशीच शक्यता अधिक आहे.’  – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर संघ