सुगावा प्रकाशनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुगावा पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे. वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीस या वर्षीपासून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रकाशक प्रा. विलास वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंदराव पानसरे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते भाई वैद्य या वेळी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, झोत, दलित चळवळीची वाटचाल, आंबेडकर आणि मार्क्स या कसबे यांच्या पुस्तकांनी वाचकांची विशेष दाद मिळवली आहे.
प्रा. वाघ यांचा नुकताच सार्वजनिक सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या निधीचा वापर ‘सुगावा’ संस्थेच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी केला जावा अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. त्यानुसार या पुरस्कारासाठी चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीने कसबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. स्वत: प्रा. वाघ, धर्मराज निमसरकर, उत्तम कांबळे आणि डॉ. विलास आढाव यांचा या निवड समितीत  सहभाग हाेता.