मंचरकर-कदम यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे

पिंपरीतील माजी नगरसेवक कैलास कदम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सुशील मंचरकर या दोन्ही परिवारातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. कदम यांच्यामुळे आपले जगणे मुश्कील झाले असून, संपूर्ण कुटुंब दहशतीच्या छायेखाली आहे. त्यांच्याकडून होणारा त्रास थांबला नाही, तर मुलींसह आत्महत्या करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पिंपरीतील नगरसेविका गीता मंचरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत गीता मंचरकर यांनी स्वत:ला तसेच कुटुंबीयांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. या वेळी मंचरकर यांना अश्रू अनावर झाले होते. नगरसेविका मंचरकर म्हणाल्या, की कैलास कदम व त्यांच्या साथीदारांनी आमचे जगणे मुश्कील केले आहे. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. यापूर्वी भर सभेत माझ्यावर हल्ला झाला आहे. कदम यांनी पोलिसांना हाताशी धरून माझे पती अ‍ॅड. सुशील मंचरकर यांना खोटय़ा पुराव्यांच्या आधारे अडकवले आहे. त्यांच्याकडे महिला गुन्हेगारांची टोळी आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आमच्या परिवारातील महिला व मुले भयभीत आहेत. आपण प्रभागात बाहेर पडल्यानंतर अंगावर गाडी घालणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार होतात. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबीयांना धोका आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. असाच त्रास सुरू राहिला तर संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करावी लागेल, असा इशारा मंचरकर यांनी दिला आहे.

‘आरोप बिनबुडाचे’

मंचरकरांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडून सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत, असे कदम यांनी म्हटले आहे. सुशील मंचरकर यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्हय़ांशी आपला काहीच संबंध नाही. त्यांनीच आपली सुपारी दिली असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. मंचरकरांकडूनच आपल्या जीवितास धोका आहे, असे कदम यांनी म्हटले आहे.