नियोजित उड्डाण पुलाच्या कामावरील क्रेनवर तरुण चढला

विवाह होत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या एका तरुणाने रावेत भागात नियोजित उड्डाण पुलाच्या कामावरील ऐंशी फूट उंच क्रेनवर चढून जीवघेणी कसरत केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाची मनधरणी करून पोलिसांनी अखेर त्याला विवाह जुळविण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या आश्वासनानंतर तो तरुण क्रेनवरून उतरला.

मूळचा मराठवाडय़ातील असलेला तरुण दुर्धर विकाराने ग्रस्त आहे. त्याचा विवाह होत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. गेल्या आठवडय़ापासून तो रावेत येथील नियोजित उड्डाण पुलावर तो काम करत होता. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तो नियोजित उड्डाण पुलाच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनवर चढला. क्रेन जवळपास ऐंशी फूट उंचीवर असल्याने त्याचा जीव धोक्यात होता. या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तरुणाला क्रेनवरून उतरण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांच्या विनंतीला तो अजिबात दाद देत नव्हता. जवळपास दीड तास पोलिसांकडून त्याला क्रेनवरून उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून त्याची मनधरणी करण्यात आली. अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी शक्कल लढविली. ‘तुझा विवाह जमवून देतो. तू क्रेनवरून उतर,’ अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर तो तरुण क्रेनवरून उतरला. दरम्यान, ही घटना परिसरात समजल्यानंतर नागरिकांची या भागात गर्दी झाली होती.

‘माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी क्रेनवर चढला होतो. मी आत्महत्या करणार नव्हतो,’ असे त्याने सांगितल्यानंतर पोलीस चक्रावून गेले. दरम्यान, तरुणाच्या जीवघेण्या कसरतीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.