दुष्काळाने होरपळल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खारीचा वाटा उचलण्याच्या प्रयत्नातून ‘परिवर्तन आधार’ योजना कार्यान्वित होत आहे. सामाजिक जाणिवेचा भाग असलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा साडेसातशे रुपये देण्यात येणार आहे.
आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी परिवर्तन आधार योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रयत्नांतर्गत जमलेली रक्कम बँकेत कायमस्वरूपी ठेवून त्याच्या व्याजातून शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना त्यांनी दहावीची परीक्षा देईपर्यंत दरमहा साडेसातशे रुपये देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. या प्रयत्नांना मोठे स्वरूप येण्यासाठी दानशुरांनी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन परिवर्तन संस्थेचे किशोर ढगे यांनी केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते दहा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देऊन रविवारी (१८ ऑक्टोबर) परिवर्तन आधार योजनेचे लोकार्पण होणार आहे. सिंहगड रस्त्यावरील गणेश मंगल कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे आणि उद्योजक एस. बालन उपस्थित राहणार असल्याचेही ढगे यांनी सांगितले. संस्थेला आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ९४२२८८५६७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.