पुण्यातील येवलेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  गुंडाप्पा शरणाप्पा शिवरे (वय -५५, रा.अप्पर इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर भागातील गुंडाप्पा शरणाप्पा शिवरे आणि त्यांचा मुलगा हे दोघे  करोनाबाधित असल्याचा  ४ जुलै रोजी रिपोर्ट आला होता. त्यानंतर या दोघांना येवलेवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ते दोघे ज्या खोलीत राहत होते, तिथे आणखी दोन रुग्ण होते. दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच गुंडाप्पा हे तणावात  होते. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गुंडाप्पा यांचा मुलगा आणि इतरजण नाष्टा करण्यासाठी बाहेर गेले असता.  गुंडाप्पा यांनी खोलीतील लोखंडी पाईपला गळफास घेत  आत्महत्या केली.

दरम्यान, इकडे बराच वेळ होऊनही नाष्टा करण्यासाठी गुंडाप्पा शिवरे हे न आल्याने, त्यांच्या मुलाने खोलीकडे येऊन पाहिले. यावर बराच वेळ दरवाजा ठोठावूनही तो न उघडल्याने आणि आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने त्याला संशय आला. यावर त्याने इतरासह डॉक्टरांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, गुंडाप्पा यांनी गळफास घेतला असल्याचे दिसून आले.  यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.  आजाराच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसानी व्यक्त केली आहे. या घटनेचा तपास कोंढवा पोलीस करीत आहे.