गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने रविवारी सकाळी वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजारामसिंह चौहान अधिक तपास करत आहेत.
किरण विलास अंबुसे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. किरण हा मूळचा सातारा येथील आहे. गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये संगणकशास्त्र शाखेच्या तिसऱ्या वर्षांत तो शिकत होता. किरण याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून आई नोकरी करते. त्याचे दोन्ही भाऊ अभियंते असून मोठा भाऊ परदेशात आहे.
किरण वसतिगृहामध्ये दोन मित्रांसमवेत राहात होता. शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करत होता. रविवारी सकाळी ९ वाजता शिकवणीला जायचे असल्यामुळे त्याने खोलीतील मित्रांना लवकर उठवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सकाळी सात वाजता त्याला जागे करून मित्र त्यांच्या शिकवणीसाठी गेले. त्याचे मित्र साडेनऊच्या सुमारास परत आले तेव्हा त्यांनी किरणला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही, असे लक्षात अल्यावर त्यांनी लाथ मारून खोलीचे दार उघडले. त्यावेळी किरण याने नायलॉनच्या दोरीच्या सहायाने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. मित्रांनी घाबरून पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्याला औंध येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच किरण याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
किरण हा महाविद्यालयातील हुशार विद्यार्थी होता. त्याला गेल्यावर्षी ९२ टक्के गुण मिळाले होते, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.