भारताची आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू प्रतिमा बोरो (वय २२, रा. आसाम) हिने पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ुटच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिने कौटुंबिक अडचणीतून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रतिमा हिने २००९ मध्ये शांघाय येथे झालेल्या तिरंदाज विश्वकप आणि यावर्षीच्या विश्व चॅम्पियन स्पर्धेत भारताकडून सहभाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय तिरंदाज खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर पुण्यातील मुंढवा भागातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ुट येथे सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या शिबिराला प्रतिमा न हजर राहिल्यामुळे तिच्या सोबतच्या खेळाडूंनी तिचा शोध घेतला असता तिची खोली आतून बंद होती. त्यांनी बाहेरून आवाज दिले असता प्रतिमाने खोली उघडली नाही. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने पंख्याला चादरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालय येथे मृतदेह पाठविण्यात आला आहे.  तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या वडिलांना दिली असून ते आसामहून निघाले आहेत. प्रतिमा ही जमशेदपूर येथील टाटा अकादमीची खेळाडू होती. तिच्या आत्महत्येमागील कारणांचा मुंढवा पोलीस शोध घेत आहेत.