कात्रजच्या संतोषनगर भागात एका महिलेने स्वत:च्या आठ वर्षे वयाच्या मुलाला गळफास देऊन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेच्या पतीचे एक वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते.
राणी सचिन राऊत (वय ३०, रा. दत्तकृपा हौसिंग सोसायटी, संतोषनगर, कात्रज) असे या महिलेचे नाव आहे. सोहम (वय ८) असे तिच्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. राणी यांची आई नंदा भैरुनाथ पांडे (वय ५०) यांनी याबाबत तक्रार दिली असून, त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राणी यांचे पतीचे एक वर्षांपूर्वी मोशी येथे उपघातात निधन झाले होते. त्यांचा शिरूर येथे केश कर्तनालयाचा  व्यवसाय होता. पतीच्या निधनानंतर सोहम याच्यासह त्या माहेरीच राहत होत्या.
राणी यांचे वडील व भाऊ नोकरीला असून, त्यांची आई पापडय़ा व कुरडया तयार करून विकण्याचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी घरातील सर्व जण कामावर गेले होते. तर दुपारनंतर राणी यांची आई नंदा याही व्यवसायाकरिता घराबाहेर गेल्या. संध्याकाळी घरी आल्यानंतर नंदा यांनी घराची बेल वाजविली. बराच वेळ बेल वाजवूनही दार उघडले न गेल्याने त्यांनी ही माहिती इमारतीखालील दुकानदार अब्बास व त्याच्या मित्राला दिली. या दोघांनीही दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी लावली असल्याने त्यांना दार उघडता आले नाही.
अब्बास याचा मित्र शेजारील इमारतीच्या छतावरून राणी यांच्या सदनिकेच्या गॅलेरीत गेला. गॅरलेरीतून घरात प्रवेश केल्यावंतर त्याने दार उघडले. नंदा या तातडीने घरात येत बेडरूममध्ये गेल्या. तेथे राणी यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. ते दृश्य पाहून त्यांचा धक्काच बसला. सोहम कुठे दिसत नसल्याने त्यांनी घरात सोहमचा शोध सुरू केला. बाथरूममध्ये एका लोखंडी अँगरला ओढणी बांधून सोहम यालाही गळफास देण्यात आल्याचे दिसल्याने त्या मोठय़ाने ओरडल्या. त्या नंतर शेजारील नागरिक जमा झाले. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.