पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस लाईनमधील आपल्या राहत्या घरी त्यांनी स्वतःचे जीवन संपवले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेमुळे पुणे पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रकांत टिळेकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्यात हवालदारपदावर ते कार्यरत होते. त्यांना गेल्या काही काळापासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजारपणाच्या नैराश्यातूनच त्यांनी आपल्या वाकड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वृत्त असे, आज (बुधवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्नी घराबाहेर जात असताना टिळेकर यांनी पत्नीला बाहेररून दरवाजाची कडी लावण्यास सांगितले. मुलं शाळा आणि कॉलेजमधून आल्यानंतर दरवाजा उघडतील असे ते म्हणाले होते. मात्र, पत्नी एक तासाने घरी परतल्यानंतर पतीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाकड पोलीस लाईनमध्ये ही घटना घडली.

टिळेकर यांचा लहान मुलगा ९ वीत आहे. तर मुलगी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. टिळेकर यांची निगडी पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. मात्र, चिखली पोलीस ठाणे झाल्यानंतर त्यांना तेथे वर्ग करण्यात आले. टिळेकर गेल्या काही काळापासून तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याने कर्तव्यावर हजर राहू शकत नव्हते. गेल्या तीन महिन्यांपासून ते रजेवर होते. त्यामुळेच या आजाराच्या नैराश्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे टिळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.