आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना यंदाचा पुलं स्मृती सन्मान जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कॉसमॉस बँक प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे आयोजित ‘पुलोत्सवा’चे गुरुवारी (९ नोव्हेंबर) महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांना पु. ल. स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मंगला खाडिलकर कल्याणपूर यांच्याशी संवाद साधणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री नऊ वाजता सुमन कल्याणपूर यांच्या भावमधुर गायकीचा मागोवा घेणारा ‘सुमनगीते’ हा कार्यक्रम सुवर्णा माटेगावकर, सई टेंभेकर आणि सौरभ दफ्तरदार सादर करणार आहेत, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी शुक्रवारी दिली.

सुमन कल्याणपूर हे नाव उच्चारताच ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘शब्द शब्द जपूनी ठेव’, ‘केशवा माधवा’, ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, ‘मृदुल करांनी छेडीत तारा’, ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’ अशी लोकप्रिय गीते आठवतात. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील आघाडीच्या संगीतकारांकडे सुमन कल्याणपूर यांनी गायलेली एकाहून एक दर्जेदार गीते अजरामर अशीच आहेत. हिंदूीप्रमाणेच मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, राजस्थानी, उडिया, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये त्यांनी गीते गायली आहेत. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव करताना कल्याणपूर यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

‘पुलोत्सवा’मध्ये शुक्रवारी (१० नोव्हेंबर) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी नऊ वाजता ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाचा विशेष खेळ होणार असून बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री नऊ वाजता या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी दृक-श्राव्य गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (११ नोव्हेंबर) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ‘भारतीय डिजिटल पार्टी’ प्रस्तुत ‘सिक्रेट मराठी स्टँड अप कॉमेडी : पु. ल. देशपांडे स्पेशल’ हा कार्यक्रम रात्री नऊ वाजता होणार आहे. पुलंकडून प्रेरणा घेऊन आदित्य देसाई, चेतन मुळ्ये, ओंकार रेगे, गौरव पवार, पुष्कर बेंद्रे या विनोदवीरांसह मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत कलाकार हे छोटे प्रवेश सादर करणार आहेत. तर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री नऊ वाजता किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायन मैफलीने ‘पुलोत्सवा’ची ‘भैरवी’ होणार आहे. मेवुंडी यांना उदय कुलकर्णी संवादिनीची आणि शंतनू शुक्ल तबल्याची साथसंगत करणार आहेत.