श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

मुले हा शब्द उच्चारताच त्याच्या जोडीने येणारे दोन शब्द म्हणजे ‘बुद्धय़ंक’ आणि ‘भावनांक’. मुलांच्या वाढीच्या आणि अभ्यासाच्या प्रगतीमध्ये नानाविध समस्या येताना आपण अनेकदा पाहतो. बुद्धय़ंक चांगला असूनही अभ्यास समजत नाही, या कारणासह वाचन-लेखन आकलनाबाबतची अडचण असल्याचे दिसते. मग ती मुले कोणत्याही आर्थिक वर्गातील असली, तरी त्यांच्या समस्या दूर करण्याची आवश्यकता असते. वस्तीपातळीवरील मुलामुलींमध्ये या प्रकारची समस्या आढळल्यास त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी या मुलांच्या पालकांमध्ये आर्थिक सक्षमतेचा जसा अभाव असतो, तसेच या मुलांसाठी काय करावे याची सुयोग्य दिशाही काही वेळा त्यांच्याकडे नसते. अशा मुले आणि पालकांसाठी ‘सुमंत्र’ ही संस्था मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे.

मुलांचे शाळागळतीचे प्रमाण या विषयावर अनेकदा चर्चा होतात. या गळतीमागे अभ्यास समजत नाही, हे एक कारण असू शकते. या मुलांना वाचन, लेखन, आकलनाबाबतची अडचण असते. तसेच ही मुले तोंडी उत्तरे व्यवस्थित देऊ शकतात, पण परीक्षेचा पेपर नीट लिहू शकत नाहीत, वाचताना अडखळतात, अक्षर उलट-सुलट करून लिहितात. तर काही मुलांना गणितात अंक ओळखता न येणे, संख्येचे स्थान लक्षात न राहिल्याने अंक उलट-सुलट जागी लिहिणे अथवा वाचणे, भाषिक गणिते न समजणे आदी विविध प्रकारच्या अडचणी येतात. ‘अध्ययन अक्षमता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समस्या सोडवण्यासाठी पालकांनी दिलेले लक्ष तसेच आर्थिक तरतूदही आवश्यक असते. हे झाले आर्थिक सक्षमता असणाऱ्यांसाठी. पण जेथे आर्थिक सक्षमतेचा अभाव आहे, तेथील, म्हणजे वस्तीपातळीवरील मुलांच्या समस्यांचे काय? त्यांची अध्ययन अक्षमतेची समस्या सोडवता यावी यासाठी स्थापना करण्यात आली आहे ती ‘सुमंत्र सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर’ ची. वस्त्यांमधील मुलांसाठी या समस्येवर उपचारात्मक अध्यापन हा प्रकल्प सुमंत्रतर्फे चालविला जातो.

मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजलेले नसते तसेच पोटापाण्यासाठी आई-वडील दोघेही दिवसभर कामावर जातात. मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना जसा वेळ नसतो, तसेच या समस्येबाबतचे पुरेसे आकलन त्यांनाही झालेले नसते. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला मिळणारी सवडही आणि समज यांचाही तेथे अभाव असतो. अशा विविध कारणांमुळे वस्त्यांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणावे म्हणून सुमंत्रच्या अध्यक्षा विनया भोसेकर यांनी समवयस्क मत्रिणींना सोबत घेऊन या विषयावर काम सुरू केले. याची कार्याची सुरुवात झाली ती अभ्यासवर्गापासून. सुरुवातीला त्यांनी कोथरूडमधील वस्त्यांमधील मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरू केले. त्याच बरोबर त्यांच्यासाठी संस्कार वर्गही घेतले. या वर्गामध्ये लेखन, वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी सुमंत्र तर्फे ‘रेमेडीयल’ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या चाचण्या घेऊन ही मुलं नेमकी कोणत्या बाबतीत मागे आहेत, ते जाणून घेण्यात आले. त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकवलं जाऊ लागले. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात गुणात्मक सुधारणा तर झालीच पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही चांगले बदल झाले.

वस्तीतील कामाबरोबरच एका शाळेमध्ये सुमंत्रने अभ्यास वर्ग सुरू केले. वर्ग सुरू करण्यापूर्वी अध्ययन क्षमता तपासण्यासाठी काही चाचण्या घेतल्या. विद्यार्थ्यांच्या समस्येचे योग्य पद्धतीने पृथक्करण करून त्यावर उपाय योजना निवडण्यात आल्या. या शाळेतील मुख्याध्यापिकांशी यावर चर्चा केली गेली. तिथल्या काही शिक्षिकांच्या मदतीने मुलांच्या अभ्यासातील अडचणी समजून घेतल्या गेल्या. भाषा आणि गणित विषयांच्या काही चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात नेमक्या कोणत्या अडचणी येतात, हे मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने समजून घेण्यात आले. कुणाला मुळाक्षरांचे लेखन जमत नव्हते तर कुणाला जोडाक्षरे लिहिता येत नव्हती. कुणाला गुणाकार-भागाकाराच्या संकल्पना समजलेल्या नव्हत्या. या चाचण्यांमुळे मुलांना कसं शिकवायचं याची दिशा निश्चित करता आली. सुमंत्रच्या सर्व शिक्षकांना अध्ययन अक्षम मुलांना शिकविण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले असून शाळेतच दुसरी ते चौथीच्या अभ्यासात मागे पडणाऱ्या निवडक मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार अभ्यास वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिकवलं जातं.

पाच वर्षांच्या कामानंतर सुमंत्र संस्थेला या कामाची व्याप्ती वाढविण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी त्यांना स्वयंसेवकांची गरज भासू लागली आहे. सुमंत्रने या विषयावरील ‘अक्षरमत्री’ हा माहितीपट बनवला आहे. या माहितीपटाचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. सुमंत्रच्या अक्षरमत्री प्रकल्पावरील १८ मिनिटांचा हा माहितीपट डॉ. मनीषा कावतकर यांनी दिग्दर्शित केला आहे. सुमंत्रने अक्षरमत्री हे पुस्तकही शिक्षक आणि पालकांसाठी प्रकाशित केले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या समविचारी लोकांची नियमित चर्चा घडायला हवी, उपाय शोधायला हवेत तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी एकमेकांना स्पर्धक न मानता सहकारी मानून काम करायला हवे असे विनयाताईंना वाटते.

सुमंत्र वस्ती व शाळा पातळीवर उपचारात्मक अध्यापनाचे काम अक्षरमत्री या प्रकल्पाद्वारे करत आहे. अध्ययन अक्षमते मागे दडलेली वैद्यकीय किंवा मनो-वैद्यकीय कारणे कुशलपणे शोधून काढणे, हे सुमंत्रच्या समुपदेशन केंद्राचे मुख्य काम आहे. हे करताना रेमेडियल टीचर्स पाल्य, त्याचे आई-वडील व त्याचे शिक्षक यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. या प्रयत्नांमुळे या मुलांच्या मनाचे व्यापार योग्य पद्धतीने समजून घेऊन हळुवारपणे हाताळल्यामुळे गुंता सुटत जातो. संस्थेचा दुसरा उपक्रम म्हणजे सृजन आनंद. या उपक्रमांतर्गत अध्ययन अक्षम मुलांना शिकविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य संस्था तयार करते.

विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्या, वर्तन समस्यांविषयी समुपदेशन, विविध मानसिक चाचण्या तसेच विविध उपचार पद्धतीही संस्थेमार्फत घेतल्या जातात. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना जोडणारा आणि त्यांच्यातील वर्तन व अध्ययन समस्यांवर अचूक उपाययोजना करणारा महत्त्वाचा

दुवा म्हणून काम करणाऱ्या सुमंत्रच्या विविध उपक्रमांची माहिती घ्यायची झाल्यास ८४०८८४०६१६ या क्रमांकावर

संपर्क साधता येईल अथवा http://www.sumantra.center ही वेबसाइट देखील पाहता येईल.

आपले मूल एक उत्तम व्यक्ती म्हणून समाजात यशस्वीपणे वावरली पाहिजे, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. त्याने स्वावलंबी बनून आत्मविश्वासाने समाजात स्वतचे स्थान निर्माण करावे असेही वाटते. पण योग्य वेळी मुलांमधील अध्ययन अक्षमता लक्षात घेऊन अशा मुलांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले तर त्यांच्यातील सुप्त गुणांना जागृत करून त्यांना सक्षम बनवणे शक्य होईल.