News Flash

गदिमांचे स्मारक अजून का होत नाही?

आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीत गदिमांनी मराठी माणसाला भरभरून दिले.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्र माडगूळकर यांचा सवाल

पुणे : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यामध्ये गदिमांचे स्मारक अजून का होत नाही, असा सवाल गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेला हे स्मारक साकारता येत नसेल तर, राज्य शासनाने हा विषय ताब्यात घेऊन गदिमांचे स्मारक उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षांस १ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी त्यांचे स्मारक साकारले जावे, अशी माडगूळकर कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. गदिमांच्या स्मारकास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही दोन वर्षांपूर्वी  जिल्हाधिकारी सौरभ राव यांना भेटून निवेदन दिले होते. तत्कालीन उपमहापौर मुकारी अलगुडे, सुनील महाजन आणि प्रवीण वाळिंबे यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. योगायोगाने आता सौरभ राव हेच महापालिका आयुक्त आहेत. त्यांनी गदिमा स्मारकाला चालना द्यावी आणि जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना स्मारकाची एक वीट तरी उभारली जावी, अशी अपेक्षा माडगूळकर यांनी व्यक्त केली. आमच्या शिष्टमंडळाने दोन महिन्यापूर्वी मा.महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठी आणि २५ हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथालेखन, दोन हजारांहून अधिक गीतांचे गीतकार, ‘गीतरामायण’सारख्या महाकाव्याचे कवी, विधान परिषदेचे दोनवेळा सदस्य आणि स्वातंत्र्यसैनिक असे गदिमांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सर्वाना ज्ञात आहेत.

आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीत गदिमांनी मराठी माणसाला भरभरून दिले. मात्र, गदिमांच्या निधनाला ४१ वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला त्यांचे यथोचित स्मारक करता येऊ  नये? गेल्या दहा-बारा वर्षांत दीड-दोन कोटी रुपये खर्च करून केवळ सीमाभिंती उभारल्या जातात. मग स्मारकाची एकही वीट उभी राहू नये? मराठी माणसाच्या हृदयात स्थान असलेला एक थोर साहित्यिक पुण्यात होऊन गेला हे भावी पिढय़ांना समजू नये का? असा सवाल माडगूळकर यांनी उपस्थित केला.

 

‘गीतरामायण एक्स्प्रेस’ नाव द्यावे

गदिमा यांच्याबरोबरच यंदा स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली एक्सप्रेस’च्या धर्तीवर जर पुणे—मुंबई दरम्यानच्या एखाद्या रेल्वेला ‘गीतरामायण एक्स्प्रेस’ नाव देता आले तर या दोघांना व ‘गीतरामायण’ या अलौकिक काव्यशिल्पाला ही एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली ठरेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:07 am

Web Title: sumitra madgulkar question over gadima memorial
Next Stories
1 महागाईच्या झळा!
2 शहरबात पिंपरी : वैद्यकीय सेवेचा बट्टय़ाबोळ
3 पिंपरीतील अग्निशामक दलाचा गोरखधंदा
Just Now!
X