गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून ०.०७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी, रविवारी (२७ सप्टेंबर) पहाटे पाणी सोडले जाणार असून सोडलेले पाणी खराडी येथे अडवून नंतर ते शेतीसाठी देण्याची योजना आहे.
विसर्जनासाठी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेतील पदाधिकारी व गटनेते तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयांची माहिती महापौरांनी दिली. ते म्हणाले की, रविवारी होत असलेल्या गणेश विसर्जनासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत पाणी सोडले जाणार आहे. या कालावधीत ०.०७ टीएमसी पाणी सोडले जाईल. दरवर्षी ०.१५ टीएमसी पाणी सोडले जाते. ते निम्म्याने कमी करण्यात आले आहे. धरणातून जे पाणी सोडले जाणार आहे ते खराडी येथील बंधाऱ्यात अडवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ते खराडी येथे अडवून नंतर शेतीसाठी दिले जाईल. तसे नियोजन करण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे तयारी पूर्ण
विसर्जनाच्या दिवशी शहरातील सतरा घाटांवर महापालिकेकडून विविध व्यवस्था केल्या जाणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. घाटांवर स्वच्छता, निर्माल्य संकलन, विसर्जनासाठी लोखंडी हौद, दिवे, सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक आदी व्यवस्था करण्यात येत आहेत.