अभिनेता संजय दत्त याची गुरूवारी पुण्याच्या येरवाडा कारागृहातून कायमची सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त विशेष विमानाने मुंबईत दाखल झाला. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर तो थेट सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेला. यानंतर त्याने मरिनलाईन्स येथे जाऊन आई नर्गिसच्या समाधीचे दर्शन घेतले.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा भोगलेला अभिनेता संजय दत्त याची गुरूवारी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या येरवाडा कारागृहातून सुटका झाली. एकूण ४२ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची आज सुटका करण्यात आली. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर जमिनीला स्पर्श करून तुरूंगावरील तिरंग्याला संजय दत्तने सलाम केला. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला लोहगाव विमानतळावर रवाना करण्यात आले. संजयला घेण्यासाठी त्याची पत्नी मान्यता, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि वकील येरवडा तुरूंग परिसरात उपस्थित होते. लोहगाव विमानतळावरून खासगी विमानाने तो मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान, लोहगाव विमानतळावर पोहोचल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजयने ‘सुटकेचा मार्ग सोपा नाही मित्रांनो, माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथे आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.

तुरूंगातून सुटल्यानंतर संजय दत्तसाठी चार्टर्ड विमान
दरम्यान, संजय दत्तची सुटका होत असतानाच प्रदीप भालेकर यांनी पुन्हा एकदा त्याच्या सुटकेला आव्हान देणारी जनहित याचिका केली आहे. त्यावर आज प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संजय दत्तच्या सुटकेनिमित्त मुंबईत ‘चिकन संजूबाबा’ चक्क फुकट!
१९९३ मधील बॉम्बस्फोटांवेळी अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती.