स्मार्तना पाटील, मनोज पाटील यांच्या बदल्या
अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने बुधवारी दिले. त्यानुसार पुणे पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांची पुण्यातील रामटेकडी येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ( एसआरपीएफ) समादेशकपदी नियुक्ती केली.
राज्य पोलीस दलातील उपायुक्त दर्जाच्या ६९ आधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री गृहविभागाने जारी केले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांची बदली पुण्यातील रामटेकडी येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी नेमणूक करण्यात आली. राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक मनोज पाटील यांची ठाणे उपायुक्तपदी केली.
आवाड यांनी वाहतूक शाखेत असताना वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या . बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली तसेच मद्य पिऊन वाहने चालविल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध प्रभावीपणे मोहीम राबविली होती. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिले होते. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षक स्मार्तना पाटील यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षकपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती केली आहे. तुषार जोशी यांची लोहमार्ग पोलीस दलाच्या पुणे विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नीलेश अष्टेकर यांची पुणे जिल्ह्य़ातील दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी नेमणूक केली आहे.