नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मांडून मंजूर करावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या मागणीसाठी अधिवेशनाच्या ठिकाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय व अंनिसचे पदाधिकारी १० डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. समितीचे प्राधान सचिव मिलिंद देशमुख या वेळी उपस्थित होते. जादूटोणाविरोधी कायद्याबाबत पाटील म्हणाले, की वटहुकमाच्या स्वरूपामध्ये २६ ऑगस्टला लागू झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याला १८० दिवसांमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मान्यता मिळणे गरजेचे आहे. आघाडी सरकारची याबाबत नतिक जबाबदारी आहे. राजकीय इच्छाशक्तीला सामाजिक पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन तीन महिने पूर्ण झाले असले, तरी अद्याप मारेकरी मोकाट असल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी शोधावेत, जादूटोणाविरोधी कायदा व्हावा व सनातनी धर्माध, मूलतत्त्ववादी शक्तींचा सरकारने प्रतिकार करावा यासाठी १४ नोव्हेंबर ते ६ जिसेंबर या कालावधीमध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई येथे २ डिसेंबरला राज्यातील परिवर्तनवादी पक्ष, संघटनांच्या वतीने मोर्चा व जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधात अफवा पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. या कायद्याविरोधात प्रचार करणाऱ्यांवर सरकारने गुन्हे दाखल करावेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ३ डिसेंबरला ‘जादूटोणाविरोधी वटहुकूम, मंजुरी व अंमलबजावणी’ या विषयावर रास्तस्तरीय चर्चासत्र होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, उपमुख्यमंत्री अजित पावर आदी त्यात सहभागी होणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.