पिंपरी-चिंचवडमधील दापोडी सीएमई गेट आतील परिसरात ठेकेदार पगार देत नसल्याने ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री आठ च्या सुमारास उघड झाली आहे. रवींद्र प्रताप सिंग वय- 45 रा. सीएमई गेट दापोडी मूळ- उत्तर प्रदेश असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सीएमई गेट च्या आतील परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे मयत हा सुपरवायझर म्हणून काम पाहात होता. मात्र, गेल्या दहा महिण्यापासून ठेकेदार शर्मा पगार देत नसल्याने रवींद्र यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी रवींद्र यांनी चिठ्ठी लिहिली असून यात ठेकेदार पगार देत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. संबंधित ठेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अस ही म्हटलं असून पगाराचे पैसे त्याच्याकडून मिळवून माझ्या कुटुंबाला द्यावेत असा चिठ्ठीत उल्लेख आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवींद्र प्रताप सिंग(वय ४५) हे गेल्या एक वर्षापासून दापोडी येथील सीएमई गेट मधील परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम पाहात होते. मयत रवींद्र हे शर्मा नावाच्या ठेकेदारा अंतर्गत सुपरवायझर कार्यरत होते. ठेकेदार शर्मा या व्यक्तीनेच रवींद्र यांना उत्तर प्रदेश येथून कामानिमित्त शहरात आणले होते. दापोडीतील इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून खासगी तत्वावर रुजू केले. मात्र, गेल्या दहा महिण्यापासून पगारच दिला नाही. त्यामुळे तणावात येऊन आज रात्री आठ च्या सुमारास सीएमई गेट मध्ये कामगारांसाठी तात्पुरते पत्रा शेड उभारले आहे त्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून चिठ्ठी च्या कागदामध्ये तफावत आढळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.