News Flash

ट्रकचालकांअभावी आवश्यक वस्तूपुरवठा ठप्प

राज्यात सुमारे १८ लाख ट्रक आणि ट्रेलर जागेवर उभे

संग्रहित छायाचित्र

कारखान्यात साठा मुबलक; वाहतूक साखळी तुटल्याने वितरकांकडे वस्तूंची चणचण

पावलस मुगुटमल

करोना विषाणू संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला असला, तरी आता हळूहळू वितरकांकडे साठय़ाची चणचण सुरू झाली आहे. कारखान्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक प्रमाणात आहे. वाहतुकीसाठी शासनाची परवानगीही आहे. मात्र, टाळेबंदीत माल वाहतूकदारांकडील चालक विविध ठिकाणी अडकून पडल्याने राज्यात सुमारे १८ लाख ट्रक आणि ट्रेलर जागेवर उभे असून, मालाच्या वाहतुकीसाठी मोठी मागणी येऊनही पुरवठा केला जाऊ शकत नसल्याची हतबलता राज्यातील वाहतूकदारांकडून व्यक्त केली जात आहे.

साखळी अपूर्ण..

सद्य:स्थितीत राज्याच्या सर्वच विभागांमध्ये धान्यासह औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असला, तरी तो स्थानिक वितरकांकडे शिल्लक असलेल्या साठय़ाच्या माध्यमातून होतो आहे.

कारण काय?

* करोनाचा संसर्ग वाढत असताना वाहतूक व्यवसायात काम करणारे अनेक चालक मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी शहरे सोडून मूळ गावी परतले.

* कारखान्यांकडून किंवा वितरकांकडून वाहतूकदारांकडे सध्या मालाच्या वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर मागणी येत असताना चालकच नसल्याने ती पूर्ण केली जाऊ शकत नाही.

* त्यामुळे टाळेबंदीनंतर ग्रामीण भागांसह विविध ठिकाणी अडकून पडलेल्या चालकांना व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत येण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधे, मास्क, सॅनिटायझर किट आदींचा तुटवडा जाणवू शकतो. वितरकांकडील साठा सध्या संपत आला आहे. शासनानेही मालवाहतुकीची परवानगी दिली आहे, पण चालकच नसल्याने मागणी पूर्ण करता येत नाही. त्यामुळे यावर लवकर निर्णय व्हायला हवा.

– बाबा शिंदे, राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:33 am

Web Title: supply of essential supplies in the absence of truck drivers abn 97
Next Stories
1 पिंपरीतले सहाजण करोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या २१
2 पुण्यातले ते १० जण मध्यप्रदेशात, विभागीय आयुक्तांची माहिती
3 पुणे विभागात करोनाग्रस्तांची संख्या १०४, विभागीय आयुक्तांची माहिती
Just Now!
X