स्वमग्न मुलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशातून निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जात आहे. स्वमग्न मुलांसह त्यांच्या पालकांसमवेत काम करणाऱ्या ‘साद’ (सपोर्ट ऑफ ऑल एबल्ड डिफरन्टली) या संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला टाटा ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ खडकी यांनी मदतीचा हात देत साद घातली आहे.
पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथे तीन एकर जागेवर हे निवासी व्यवसाय केंद्र साकारले जात आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून ८ एप्रिल रोजी या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. मुख्य म्हणजे केतकावळे येथील ही जागा स्वमग्न मुलांच्या पालकांनीच विकत घेऊन साद संस्थेला देणगी दिली आहे, अशी माहिती साद संस्थेच्या विश्वस्त सुनीता लेले यांनी गुरुवारी दिली. रोटरी क्लब ऑफ खडकीचे अध्यक्ष शिरीष चोपडा आणि डॉ. अलोक पटेल या वेळी उपस्थित होते. शनिवारी (२ एप्रिल) जागतिक स्वमग्न दिन साजरा होत असून त्यानिमित्त मुलांची दंत आरोग्य तपासणी आणि मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साद संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वमग्न मुलांच्या पालकांनी संस्थेच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ही जागा दान केली आहे. येथे बहुउद्देशीय निवासी केंद्र (अॅक्टिव्हिटी सेंटर आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स) उभारण्यात येत आहे. यामध्ये संस्थेतील स्वमग्न मुलांबरोबरच समाजाच्या उपेक्षित घटकातील स्वमग्न मुलांनाही सामावून घेण्यात येणार आहे. ‘उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) अंतर्गत टाटा ग्रुपने आणि रोटरी क्लब ऑफ खडकी यांनी या केंद्रासाठी सहकार्य देऊ केले आहे. या निवासी केंद्रामध्ये स्वमग्न मुलांना स्कूटर पुसण्यापासून ते भाजी निवडणे-चिरणे अशा वेगवेगळ्या छोटय़ा कामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मुलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना सन्मानाने जगण्याचा रस्ता प्रशस्त करण्याच्यादृष्टीने साहाय्यभूत व्हावे हा प्रयत्न असल्याचे सुनीता लेले यांनी सांगितले.

बाबा आमटे विकलांग योजनेअंतर्गत
दरमहा दोन हजार रुपयांचे अनुदान
‘साद’ परिवारातील संदीप रोडे या पालकाने स्वमग्न आणि दिव्यांग मुलांना आर्थिक साहाय्य द्यावे यासाठी पुणे महापालिकेशी संपर्क साधला. त्यांच्या आवाहनाला स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘स्वर्गीय पद्मश्री बाबा आमटे विकलांग योजने’अंतर्गत विशेष गरज असलेल्या १२०० स्वमग्न आणि दिव्यांग मुलांसाठी दरमहा दोन हजार रुपयांची तरतूद केली असल्याचे सुनीता लेले यांनी सांगितले.