राज्यातील बैलगाडा शर्यतीवर लादलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्शत परवानगी दिली. या संदर्भातील अंतिम निकाल लागेपर्यंत बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती द्यावी हा खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य़ ठरविण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य याचिकाकर्ते आढळराव यांना आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. नामवंत वकील हुजेफा अहमदी आणि अ‍ॅड. अनिरुद्ध रजपूत यांनी युक्तिवाद करताना अंतिम निकाल लागेपर्यंत बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे, शर्यतीदरम्यान जनावरे आणि मनुष्यहानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना या अटींवर शर्यती घेण्यास परवानगी दिली आहे. गेली दोन वर्षे लादलेल्या बंदीमुळे वात्रंजी, दुकानदार, जनावरे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा पहिला मोठा विजय असून अंतिम निर्णयही आमच्याच बाजूने लागेल, असा आशावाद शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.