‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात सुप्रिया देवस्थळी यांचे तरुणाईला आवाहन

‘‘कोणत्याही व्यवस्थेत सहभागी होण्याचा निर्णय स्वखुशीने घेतल्यानंतर काम करताना किंवा निवृत्त झाल्यावरही त्यावर टीका करणे योग्य नाही. नागरी सेवेत काम करून बदल घडवता येतात. तरूणाईने नागरी सेवेत येऊन अपेक्षित बदल घडवावेत’’, असे आवाहन केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर मंडळाच्या लेखा निबंधक सुप्रिया देवस्थळी यांनी शनिवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये केले.

केसरी टूर्स प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये देवस्थळी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, आतापर्यंत आलेली आव्हाने, परीक्षेसाठीचा कानमंत्र यांपासून ते वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), निश्चलनीकरण, भ्रष्टाचार, महिला म्हणून येणारी आव्हाने अशा अनेक विषयांवर उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम आणि ‘केसरी टूर्स’च्या वंदना मुळे यांनी देवस्थळी यांचे स्वागत केले. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी देवस्थळी यांना बोलते केले.

‘‘स्पर्धा परीक्षेची तयारी आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाची संधी मिळणे यातील प्रक्रिया मोठी आहे. त्यामध्ये निराशेचे क्षण येऊ शकतात. मात्र, आपले ध्येय पक्के असेल आणि त्यावरच लक्ष केंद्रित केले तर कणखरपणा आपोआप येतो’’, असे देवस्थळी यांनी सांगितले.  ‘‘सर्वच उमेदवार हे प्रशासकीय सेवेत आणि आपल्याच राज्यात काम करण्यासाठी परीक्षा देत असतात. मात्र, मोजक्याच उमेदवारांना त्यांना हवे तसे पद मिळते. दुसऱ्या एखाद्या विभागातील पद मिळाल्यामुळे खट्टू होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण नेहमीच जास्त असते. मात्र ही निराशा प्रत्यक्ष सेवेत काम सुरू केल्यानंतर राहात नाही. मिळालेल्या पदावर उत्तम काम करणे आपल्या हातात असते आणि त्यातून चांगले बदल घडवता येतात’’, असे ठाम मत देवस्थळी यांनी व्यक्त केले.

जीएसटी अमलात आणण्यासाठी होणाऱ्या विरोधाबाबतही देवस्थळी यांनी भाष्य केले. ‘‘एखाद्या व्यवस्थेत बदल करायचा झाल्यास त्याला विरोध होतच असतो. कर प्रणालीतील हा बदल मोठा आहे. त्याला विरोध होणार हे प्रशासनानेही गृहीत धरलेले असते. मात्र विरोध झाला तरी कोणत्याही व्यवस्थेत कालानुरूप बदल गरजेचे असतात. अनेक प्रक्रिया या गुंतागुंतीच्या असतात, त्याचे सुलभीकरण होऊन परिणाम दिसण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. जीएसटीचे दूरगामी परिणाम चांगले आहेत. त्याचा सामान्य माणसालाही फायदा होणार आहे’’, असे देवस्थळी यांनी स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि वाचकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांचे प्रश्न आणि त्याला देवस्थळी यांनी दिलेली दिलखुलास उत्तरे यातून कार्यक्रम रंगत गेला. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती.