जगाचे लक्ष लागलेल्या करोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत. यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार? असे कौतुकाचे उद्गार काढणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘त्या स्वप्नात आहेत का?’ असा प्रश्न करीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.
महाआघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या योगायोगाचा संदर्भ देत इंदापूर येथील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी ‘जगाचे लक्ष लागलेल्या करोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत. यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ?’ असे कौतुकाचे उद्गार काढत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्याला पाटील यांनी ‘त्या स्वप्नात आहेत का?’ असा प्रश्न विचारत प्रत्युत्तर दिले.

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटील यांनी महात्मा फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. त्या वेळी बोलताना पाटील म्हणाले, महाआघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मराठा आरक्षण असो किंवा अतिवृष्टी, कोणत्याही विषयामध्ये सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जास्त वेळ खर्च होतो आहे. तीन पक्षात कोणताही समन्वय नाही.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने काय बोलावे अशी कोपरखळी पाटील यांनी मारली.