पुणे शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास करण्यात  सरकार अपयशी ठरले असून सध्या गावाची परिस्थिती लक्षात घेता. या गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेने शंभर कोटी रुपये द्यावे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलना दरम्यान केली. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने पुणे शहरालगतची अकरा गावे महापालिकेत समाविष्ट करून दोन वर्षाचा कालावधी झाला. मात्र अद्यापही त्या ठिकाणी कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असून या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

मारहाणीच्या घटना घडतात प्रशासन आणि पोलीस काय करतात?

रामदास आठवले आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्यांबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. कोणालाही मारहाण झाली तरी ती वाईटच गोष्ट आहे. या मारहाणीची चौकशी झाली पाहिजे. तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा काय करते. असा सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.