25 February 2020

News Flash

सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला

सुळे यांना नेहमीप्रमाणे बारामती विधानसभेतून सर्वाधिक मतदान झाले.

(संग्रहित छायाचित्र)

बारामती, दौंड, पुरंदर, भोरमधून मोठय़ा प्रमाणावर मतदान

भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेचा गड सलग तिसऱ्यांदा राखला. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेत पराभव केला. सुळे यांना नेहमीप्रमाणे बारामती विधानसभेतून सर्वाधिक मतदान झाले. त्यापाठोपाठ दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदार संघांतूनही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर मते मिळविली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित आणि लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुळे यांना याच मतदारसंघात विजयासाठी झगडावे लागले. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. पहिल्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या सुळे यांचा २०१४ मध्ये सुमारे ६९ हजार मतांनी रडतखडत विजय झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात सुळे यांचा पराजय होऊ शकतो, असे बळ कार्यकर्त्यांना देत ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनीही मतदारसंघात विशेष लक्ष घातले होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. बारामती लोकसभेसाठी ६१.५४ टक्के मतदान झाले होते. एकटय़ा बारामती विधानसभेत ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे याच मतदारसंघातून सुळे यांना सर्वाधिक दीड लाखांच्या आसपास मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सुळे पिछाडीवर होत्या. मात्र, त्यानंतर एकदम मोठे मताधिक्य घेऊन त्या शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिल्या.

बारामतीसह सुळे यांनी दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघातही आघाडी घेतली. टपाली मतदान वगळता शेवटच्या चोविसाव्या फेरीपर्यंत सुळे यांना ६ लाख ८३ हजार ७०५ मते मिळाली होती. कुल यांनी ५ लाख २८ हजार ७११ मते मिळविली. वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांनी ४४ हजारांच्या आसपास मते मिळविली. तर, कुल यांना दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले.

First Published on May 24, 2019 3:17 am

Web Title: supriya sule win baramati
Next Stories
1 अजित पवारांना मोठा धक्का
2 आगरी मतांचे ध्रुवीकरण नाहीच!
3 ठाणे जिल्ह्यात युतीचा जल्लोष!
Just Now!
X