चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज धरणीधर देव (वय ६३) यांनी चिंचवड गावातील मंगलमूर्ती वाडय़ात असलेल्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
श्री मोरया गोसावी यांचे वंशज असलेले सुरेंद्रमहाराज हे सुमारे १५ वर्षांपासून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी कार्यरत होते. अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक ही मंदिरे चिंचवड देवस्थानच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे देवस्थानचे मुख्य विश्वस्तपद अतिशय मानाचे व आदरणीय मानले जाते. सुरेंद्रमहाराज हे शनिवारी रात्री जेवण करून वाडय़ातील खोलीत झोपण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी नऊ वाजले तरी ते झोपेतून न उठल्याने त्यांचा मुलगा दर्शन याने त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजविला. बराच वेळ काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सुरेंद्रमहाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मुख्य विश्वस्त होण्यापूर्वी सुरेंद्रमहाराज राजकारणात सक्रिय होते. १९९२ मध्ये ते नगरसेवकपदी निवडून आले होते. १९९७ मध्ये ते पिंपरी महापालिकेत स्वीकृत सभासद म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर २००१ मध्ये देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदाचा कार्यभार स्वीकारला. देवस्थानचे काम लोकाभिमुख करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी चिंचवड गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.