माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी लोकसभेच्या २००९ सालच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केला. त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल असूनही गेली पाच वर्षे ते न्यायालयात हजर झाले नाहीत. परिणामी, पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ते पाच वर्षांपासून फरारच होते.. आता खासदारकी लढवत असतानाचा हा गुन्हा, पण आता खासदारकी गेल्यावर ते या गुन्ह्य़ात खडकी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांच्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
लोकसभेच्या २००९ साली झालेल्या निवडणुकीत कलमाडी हे पुणे मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष या पक्षांच्या आघाडीचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी १३ एप्रिल २००९ रोजी संचेती रुग्णालय ते मुळा रोड दरम्यान फेरी काढली होती. या फेरीमध्ये नियमापेक्षा जास्त वाहनांचा समावेश केल्यामुळे खडकी पोलीस ठाण्यात कलमाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासह आमदार विनायक निम्हण, अनिल भोसले, दीप्ती चवधरी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ात खडकी पोलिसांनी काही जणांस अटक केली होती.
मात्र, कलमाडी हे न्यायालयात हजर झाले नाहीत किंवा पोलिसांनीही त्यांना हजर केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ते गेल्या पाच वर्षांपासून फरारच होते. या गुन्ह्य़ात हजर राहण्याबाबत खडकी न्यायालयाने त्यांना बजावले होते. मात्र, काही तारखांना हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना हजर न राहिल्यास अटक वॉरन्ट काढण्याचे समन्स बजावले होते. त्यामुळे कलमाडी यांना अखेर वेळ काढावा लागला. ते त्यांचे वकील एस. के. जैन यांच्यासह मंगळवारी दुपारी खडकी न्यायालयात हजर झाले. खडकी न्यायालयाने त्यांच्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला.. विरोधाभास इतकाच, की कलमाडी यांच्यावर खासदारकीच्या निवडणुकीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच वर्षी त्यांची खासदारकीची मुदत संपली. त्यानंतर ते या गुन्ह्य़ासाठी न्यायालयात हजर झाले.