‘रेल्वेच्या विकासात भारत जपान आणि चीनपेक्षा खूप मागे आहे. भारतीय रेल्वेच्या विकासासाठी आर्थिक तरतूद येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यात येईल,’ असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी सांगितले. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या रेल्वेमार्गावर २०० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवासी रेल्वे चालविण्यासाठी प्रसत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेसच्या (एसआयआयबी) रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, थायसनकृप इंडियाचे उपाध्यक्ष दारा दमानिया, एसआयआयबीच्या संचालिका डॉ. अस्मिता चिटणीस आदी उपस्थित होते. एसआयआयबीच्या ‘अविस्मरणीय’ या पुस्तकाचे प्रकाशनही प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रभू यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, संजय किर्लोस्कर, एस. के. जैन तसेच संस्थेचे माजी संचालक यांचा सत्कार करण्यात आला.

प्रभू म्हणाले, ‘चीन आणि जपान या देशांनी रेल्वेच्या विकासासाठी खूप पूर्वीपासून आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्या तुलनेत आपण मागे आहोत. रेल्वेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. आता रेल्वेसाठीची आर्थिक तरतूद वाढवण्यात येणार असून येत्या काही वर्षांत रेल्वेचा अर्थसंकल्प २ लाख ७५ हजार कोटी रु पयांपर्यत वाढविण्यात येईल. त्यानंतर रेल्वे क्षेत्राचा सर्व बाजूंनी विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद ८ लाख ७० हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येईल. देशात ४० हजार रेल्वेडब्यांचे नूतनीकरण केले जाईल. प्रवाशांच्या समस्या व तकोरी तत्काळ सोडविण्याला अधिक भर दिला जाईल. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या मार्गावर येत्या काही दिवसांत २०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.’

रेल्वेच्या मोकळ्या जागेत जंगले उभी करणार

रेल्वे मंत्रालयाचा वनविभागाशी झालेल्या करारानुसार रेल्वेच्या मोकळ्या जागा व रु ळाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येईल, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. यामध्ये ज्या अडचणी येत आहेत. त्याही चर्चा करून सोडविण्यात येतील. तसेच १३ कोटी झाडे लावण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा व पर्यावरण संरक्षणात हातभार लावावा, असेही ते म्हणाले. शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाच्या प्रचाराची सुरुवाच प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. यावेळी आमदार मंगल लोढा, तहसीलदार रंजित देसाई, वनविभागाचे अधिकारी विवेक खांडेकर, रंगनाथ नाईकडे, सोमनाथ ताकवले, पीएमआरडीएचे अधिकारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे नीलेश गराडे, रौनक खरे, सूरज शिदे, शुभम काकडे आदी उपस्थित होते.