News Flash

सुरेश वाडकर म्हणजे सांस्कृतिक ठेवा असलेले व्यक्तिमत्त्व – पं. मंगेशकर

प्रेमगीते, गझल, पॉप, कव्वाली, भजने अशी गीते लीलया गाणारे व मराठीसह हिंदूी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी भाषांची चांगली जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न

| December 9, 2013 02:41 am

प्रेमगीते, गझल, पॉप, कव्वाली, भजने अशी गीते लीलया गाणारे व मराठीसह हिंदूी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी भाषांची चांगली जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रतिपादन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी चिंचवड येथे केले.
पिंपरी नाटय़ परिषदेच्या वतीने सुरेश वाडकरांना नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते आशा भोसले पुरस्काराने गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते विनोद नढे, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, नगरसेवक गणेश लोंढे, संतोष पाटील आदी व्यासपीठावर होते.
पं. मंगेशकर म्हणाले, वाडकर दीदीला आईसाहेब व मला मामा म्हणतात. आमचे नाते जुने आहे. २१ व्या वर्षीच ते माझ्याकडे ‘दया घना’ गायले. वाडकर सर्वगुणसंपन्न गायक, तानसेन आणि कानसेनही आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार दिला. १२ वर्षांनंतर वाडकरांचे नाव जाहीर केले. मात्र, त्यांच्यानंतर हा पुरस्कार कोणाला द्यायचा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण तितक्या उंचीचे नाव दृष्टिक्षेपात नाही. नवीन गायक, संगीतकार निर्माण होत नाही. वळवासारखे येतात, वाहून जातात, टिकून राहत नाहीत. पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे पुरस्कारांचे पीक येते व एखाद-दुसऱ्या वर्षांनंतर त्या संस्था लुप्त होतात. मात्र, नाटय़ परिषदेने सातत्य ठेवले व भोईरांनी त्यासाठी कष्ट घेतले. लतादीदी व आशाताईंची गाणी ऐकत आमची पिढी मोठी झाल्याचे सांगत काकडे यांनी सध्याची गाणी आठवत नसल्याचे मत व्यक्त केले. करंजीकर यांनी सांस्कृतिक पर्यावरणाची गरज व्यक्त केली. भोईर यांनी प्रास्तविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन व सांकला यांनी आभारप्रदर्शन केले.
..ती माझी दैवते – वाडकर
माझ्या दैवतांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. सर्व मंगेशकर भावंडांचे आपल्याला सातत्याने प्रेम मिळाले आहे, अशी भावना सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली. रसिकांच्या विनंतीनुसार वाडकरांनी ‘और इस दिल में, मेघा रे-मेघा रे, सपनो मे मिलती हैं आणि चप्पा-चप्पा चरखा चले’ ही गाणी सादर केली, त्यामुळे रसिकांनी ठेका तर धरला व एकसुरात टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दादही दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2013 2:41 am

Web Title: suresh wadkar is cultural deposit pt hridaynath mangeshkar
टॅग : Suresh Wadkar
Next Stories
1 देशाच्या एकात्मतेसाठी ‘रन फॉर युनिटी’
2 शिवरायांच्या किल्ल्यांबद्दल शासनाची अनास्थाच – निनाद बेडेकर
3 पुण्यात थंडीचा कडाका
Just Now!
X