19 January 2020

News Flash

एका शस्त्रक्रियेचा प्रवास!

डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या मुलीला हृदयविकार असल्याचे लक्षात आले आणि तिथपासून सुरू झाला तिच्या उपचारांचा प्रवास.

मुळशीतील गोठे गावात राहणारी सात वर्षांची मुलगी.. आई-वडील नाहीत.. आजी आहे, पण घरची परिस्थिती हलाखीची.. २०१४ मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या मुलीला हृदयविकार असल्याचे लक्षात आले आणि तिथपासून सुरू झाला तिच्या उपचारांचा प्रवास.
सरकारी वैद्यकीय सेवा प्रामुख्याने चर्चिल्या जातात त्या असुविधांसाठी! परंतु ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाच्या उपचारांच्या प्रत्येक पायरीवर प्रयत्न करून उपचार पूर्ण केल्याचीही उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण या चिमुकलीच्या हृदयशस्त्रक्रियेच्या रूपाने पाहायला मिळाले.
मुळशीतल्या या मुलीच्या शाळेत झालेल्या तपासणीनंतर हृदयविकाराची खात्री करण्यासाठी ‘टू-डी एको’ तपासणी करणे गरजेचे होते. परंतु कधी या तपासणीचे शिबिरच झाले नाही म्हणून, कधी तिच्या आजीला तिला घेऊन येणे जमले नाही म्हणून, असे करत तिची तपासणी लांबत गेली. अखेर सप्टेंबर २०१५ मध्ये तपासणी झाली आणि तिच्या हृदयाला जन्मजात छिद्र असून शस्त्रक्रिया गरजेची असल्याचे कळले.
ही शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली. रुग्णाच्या आरबीएसके डॉक्टर डॉ. ज्योत्स्ना धुमाळ यांच्यासह फार्मासिस्ट, परिचारिका आणि वाहनचालक अशा टीमने १९ मार्चला तिची शस्त्रक्रिया करवून घेतली. डॉ. धुमाळ म्हणाल्या, ‘तपासणीसाठी तसेच रुग्णालयात दाखल होण्यासाठी ती आणि तिची आजी पौडपर्यंत बसने येत आणि पुढे आम्ही त्यांना आरबीएसकेच्या गाडीने पुण्यात आणायचो. त्यांच्याकडे केवळ रेशन कार्ड आणि आधार कार्ड होते. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र काढण्यात आणखी काही दिवस गेले. तिच्या शाळेतील शिक्षकांची त्यासाठी मदत झाली. राजीव गांधी योजनेसाठी तिची नोंदणी आम्ही करून घेतली. पण शस्त्रक्रियेपूर्वीही आणखी काही तपासण्या लागणार होत्या आणि त्यासाठीचा ५-६ हजारांचा खर्च त्यांना झेपणारा नव्हता. पुण्यातील ‘समवेदना’ या संस्थेने हा खर्च उचलला. शस्त्रक्रियेसाठी पुण्यात येण्याच्या एक दिवस आधीच तिला पौडमध्ये यावे लागणार होते. पौडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुमेध आंदूरकर यांनी तिला पौड रुग्णालयात ठेवण्यासाठी मदत केली.’

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील उपचार व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुकर होणे गरजेचे आहे. केवळ या कामासाठी वेगळे युनिट तयार करण्याची आवश्यकता आहे’
– डॉ. दिनेश घार्गे, आरबीएसके डॉक्टरांच्या संघटनेचे प्रवक्ते

First Published on April 2, 2016 3:19 am

Web Title: surgery travel rbsk
टॅग Surgery
Next Stories
1 उत्पादन घटल्याने साखर भाव खाणार?
2 पाहा कोणत्या शहरात रेडी रेकनरच्या दरात किती वाढ?
3 टक्केवारीचे वाद, श्रेयासाठी कुरघोडी अन् विकासकामांचे ‘तीन-तेरा’
Just Now!
X