सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ

ग्राहक पेठेच्या संस्कारक्षम वह्य़ांवर अटलजींच्या कविता आणि चित्र आम्ही घेतले होते. डॉ. अरविंद लेले यांच्यामार्फत त्या वह्य़ा घेऊन आम्ही त्या अटलजींना दाखवण्यासाठी राजभवनावर गेलो, त्या वेळी त्यांनी त्यांच्या कवितेतील पहिल्या दोन ओळी स्वाक्षरीसह वहीच्या पहिल्या पानावर लिहून दिल्या होत्या. तो अमूल्य ठेवा आजही ग्राहक पेठेकडे आहे. ग्राहक पेठेच्या एका मजल्यावरील दालनाचे उद्घाटन सन १९७९ मध्ये अटलजींच्या हस्ते झाले. त्या वेळी ग्राहक पेठ ही केवळ रास्त भावाचे विक्री केंद्र न राहता ग्राहक चळवळींचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा अटलजींनी व्यक्त केली होती. मला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा भाजपचे उत्तमराव पाटील मला अटलजींकडे घेऊन गेले होते. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्यावर मी त्यांच्याबरोबरच छायाचित्र घेण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, हॉलमध्ये छायाचित्र चांगले येणार नाही, आपण बाहेरील हॉलमध्ये जाऊ. त्यानंतर त्यांनी स्वत: हॉलमध्ये येऊन मी, उत्तमराव पाटील, वसंत खरे आणि ठकसेन पोरे यांच्या समवेत छायाचित्र काढले.