News Flash

अनाथ मुलांसाठी नवे कपडे शिवण्याच्या उपक्रमाची ‘नवमी’!

शिवणकाम हा माझा छंद आहे.

सुषमा गोडबोले यांनी शिवलेले फ्रॉक

आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यक असतो, पण आपल्या छंदाचा उपयोग समाजातील गरजूंच्या भल्यासाठी झाला तर जीवनामध्ये किती आनंद मिळतो याची प्रचिती सुषमा गोडबोले यांना आली आहे. शिवणकाम या छंदातून अनाथ मुलांसाठी नवे कपडे शिवण्याच्या त्यांच्या उपक्रमाची नवमी म्हणजेच नऊ वर्षे झाली आहेत. अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये मुलांसाठी नवीन कपडे शिवून देण्याचे काम त्या अगदी आनंदाने करीत आहेत. वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये प्रवेश करतानाही त्यांनी आपल्यातील ही सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे.

शिवणकाम हा माझा छंद आहे. अनाथ मुलांना दिवाळीमध्ये नवे कपडे घालता यावेत म्हणून मी स्वत: शिवलेले १४० नवे कपडे यंदा एका सेवाभावी संस्थेमध्ये नेऊन दिले. नव्या कपडय़ांच्या परिधानाने अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या आनंदातच माझी दिवाळी साजरी झाली, अशी भावना सुषमा गोडबोले यांनी व्यक्त केली. शिवणकामाचा आनंद लुटत असताना आपण कोणाच्या तरी उपयोगाला पडतो हीच जाणीव सुखावणारी आहे. आरोग्य विभागातून सहसंचालक म्हणून निवृत्त झालेले पती डॉ. विजय गोडबोले यांचा माझ्या या कामामध्ये मोठा वाटा आहे, अशा शब्दांत त्यांनी जीवनाच्या जोडीदाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाची दशकपूर्ती करण्याचे बळ परमेश्वराने मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे. ज्यांना असे काही करणे शक्य असेल त्यांनी स्वत:साठी जगतानाच दुसऱ्यासाठीही थोडेफार काही करावे, अशी भावना सुषमा गोडबोले यांनी व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी आम्ही गुजरातमधील बलसाड येथे वास्तव्यास होतो. तेथे खूप वादळी पाऊस येतो. असाच एकदा वादळी पाऊस आला आणि आमच्या घरासमोरील पदपथावर असलेली फुगेवाल्याची पाल (झोपडी) भिजून गेली. त्या पावसात एक दीड-दोन वर्षांचे मूल भिजले होते. बहुधा बाळाच्या आईजवळ दुसरे कोरडे कपडे नसावेत. तिने मुलाला टॉवेलमध्ये गुंडाळले. गॅलरीतून हे दृश्य पाहताना मला वाईट वाटले. मी त्या बाईला विचारून संध्याकाळपर्यंत चार कपडे शिवून दिले. पुढे महिनाभर मला ते मूल त्याच कपडय़ांमध्ये दिसले. हा उपक्रम करण्याची कल्पना कशी सुचली याची ही कहाणी सुषमा गोडबोले यांनी सांगितली. गेली २५ वर्षे मी गरजूंना जुने कपडे देत होते, पण आपण नवे कपडे परिधान करतो. मग ज्यांना द्यायचे त्यांना नवीन कपडे का देऊ नयेत, असा विचार मला सुचून गेला. पहिल्या वर्षी दिवाळीला मी नवीन कपडे शिवून स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले. पुढे दरवर्षी नव्या कपडय़ांचा आकडा वाढतच गेला. गेल्या वर्षी मी शंभर नवे कपडे शिवले होते. यंदा माझ्या हातून १४० कपडे शिवले गेले याचा आनंद आहे. ‘लहान मुलांचे काम हे देवाचे काम’ ही आईने दिलेली शिकवण माझ्यासाठी शिदोरी म्हणून उपयोगी पडली. हुजूरपागेत शिवणाचे शिक्षण घेऊन मुलींचे कपडे शिवण्यापुरतीच माझी कला होती. पण, मी हा उपक्रम सुरू केल्याचे समजताच नातेवाईक आणि मैत्रिणींनी वेगवेगळी कापडे आणि ब्लाऊजपीस देऊन मला मदत केली. रद्दीच्या पैशांतून नवीन कापड खरेदी करून मी नवे कपडे शिवते. घरात सगळीकडे पसरलेली कापडं, मशीन, सुया, बटणे तसेच मी खर्च केलेला पैसा याबद्दल यजमानांनी कधीही तक्रार केली नाही. उलट माझ्या कामात मदत करून त्यांनी सदैव प्रेरणा दिली, असेही सुषमा गोडबोले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 12:52 am

Web Title: sushama godbole helps to orphan children
Next Stories
1 शहरात घरफोडय़ांचे सत्र सुरू
2 ‘प्राचीन संस्कृती असलेला देश जाती व्यवस्थेमुळे विखुरलेला’
3 मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, १६ प्रवासी जखमी
Just Now!
X