गरिबीशी संघर्ष करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे कर्तृत्व दाखविणाऱ्या पद्मशाली समाजाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी रविवारी दिले. पुणे-सोलापूर मार्गावर नव्याने सुरू झालेल्या रेल्वेला मरकडेयश्वरांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
पुणे पद्मशाली संघमतर्फे पद्मशाली समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र अधिवेशनाच्या समारोप सत्रात सुशीलकुमार िशदे बोलत होते. सोलापूरचे माजी खासदार धर्माण्णा सादूल, ज्येष्ठ नेते विष्णूपंत कोठे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, महेश कोठे, अजय दासरी, आमदार मोहन जोशी, रोहित टिळक, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सोमनाथ केंची, अध्यक्ष वसंतराव येमूल याप्रसंगी उपस्थित होते. मुकुंदराज शिंगारम यांच्या ‘तिरुपतीचा श्री व्यंकटेश-पद्मशाली समाजाचा जावई’ या पुस्तकाचे प्रकाशन िशदे यांच्या हस्ते झाले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पद्मशाली समाजाच्या गल्लीमध्येच माझे बालपण गेले आहे. हा समाज गरीब, कष्टकरी असला तरी क्रांतिकारी आणि विचारशील आहे. तेलगू भाषक प्रांतातून येथे आलेला हा समाज मराठी मातीशी एकरूप झाला. हेच खरे भारतीयत्व आहे. जाती-धर्मापलीकडे जाऊन विचार करीत भेदभाव न करण्याची भूमिका स्वीकारणाऱ्या पद्मशाली समाजाच्या मतांमुळेच सर्वसाधारण जागेवरून मला दोनदा खासदार म्हणून निवडून दिले. एवढेच नव्हे तर, सामान्य कार्यकर्ता आज देशाचा गृहमंत्री म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. रुग्णालय, बँक, शिक्षण संस्था या माध्यमातून पद्मशाली समाज सहकार चळवळीत कार्यरत आहे. सोलापूरला टेक्सटाईल पार्क देण्यात आला असून नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुण्यालाही टेक्सटाईल पार्क देण्यासाठी प्रयत्न करू.