व्यावसायिक सरोगसीवरील बंदीमुळे हजारो कोटी रुपयांच्या बाजारपेठेला धक्का

भाडोत्री मातृत्वाच्या (सरोगसी) अपेक्षेने भारतात येणाऱ्या परदेशी जोडप्यांवर बंदी घालण्यापाठोपाठ आता व्यावसायिक सरोगसीलाही बंदी घातल्यामुळे भारतात उभ्या राहिलेल्या हजारो कोटी रुपयांच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसला आहे. मात्र त्याचबरोबर बंदीची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी सरोगसीची प्रक्रिया सुरू केलेल्या अनेक जोडप्यांचा अधिकार असलेले भ्रूण आता भारतात अडकून पडले आहे. हे भ्रूण किती दिवस जपून ठेवायचे या पेचात सरोगसीची सुविधा देणारी इस्पितळे अडकली आहेत.

केंद्राने व्यावसायिक पातळीवर सरोगसी करण्यावर बुधवारी बंद घातली. मात्र त्यापूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने (आयसीएमआर) परदेशी जोडप्यांना भारतात सरोगसीच्या माध्यमातून मूल घेण्यासाठी बंदी घातली होती. त्यामुळे बाजारपेठेला धक्का तर बसला आहेच पण ही बंदी येण्यापूर्वी भारतात सरोगसी करण्यासाठी आलेली परदेशी जोडपी आणि त्यांना सुविधा पुरवणारी इस्पितळे पेचात सापडली आहेत. सरोगसी ही काही एक-दोन दिवसांमध्ये होणारी प्रक्रिया नाही. सरोगसीच्या माध्यमातून मूल हवे असलेल्या जोडप्यापैकी शुक्राणू किंवा स्त्री बीजापासून प्रयोगशाळेत भ्रूण तयार केले जाते. त्यानंतर ते भ्रूण भाडोत्री मातेच्या गर्भात सोडले जाते. मात्र बंदीपूर्वी ज्या जोडप्यांच्या शुक्राणू किंवा स्त्रीबीजापासून भ्रूण तयार झाली आहेत ती भ्रूण आता भारतात अडकून पडली आहेत. भारतात सध्या अशी भ्रूण गोठवून ठेवण्यात आली आहेत. अशा जोडप्यांबाबत राज्याच्या पातळीवर निर्णय घेण्यात यावेत असे यापूर्वीच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. मात्र हे निर्णय अद्यापही झालेले नाहीत.

‘महाराष्ट्रात गोठवून ठेवलेल्या भ्रूणांबाबत संभ्रमच आहे. राज्यातील एखाद्या रुग्णालयाचे उदाहरण घेतले तरीही त्यांच्याकडे किमान ६०-७० परदेशी जोडप्यांची भ्रूण असतील. भ्रूण निर्माण होईपर्यंत जी प्रक्रिया होते त्यालाही काही खर्च येतो. त्याचप्रमाणे हे त्या जोडप्याशी एक प्रकारे कंत्राट असते. भावनिकदृष्टय़ा बोलायचे झाल्यास हे भ्रूण या जोडप्याचाच अंश असते. त्यामुळे त्याबाबत वेळेत निर्णय होणे गरजेचे आहे,’ असे मुंबईतील एका डॉक्टरांनी सांगितले.

भारतातील सरोगसी उघडपणे स्वीकारणाऱ्या आणि सरोगसीची सुविधा देणारे सर्वात मोठे रुग्णालय चालवणाऱ्या आणंद येथील डॉ. नयना पटेल यांनी सांगितले, ‘यापूर्वी घातलेल्या बंदीमुळे आणि आता नव्याने येऊ घातलेल्या कायद्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. सध्या तातडीने समोर येणारा प्रश्न हा परदेशी जोडप्यांच्या भ्रूणाचा आहे. फक्त माझ्या रुग्णालयाचा विचार केल्यास माझ्याकडे अशी दोनशे ते अडीचशे भ्रूण गोठवून ठेवावी लागली आहेत. भारतीय जोडप्यांकडूनही सरोगसीला मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य दिले जात होते. सध्या अर्धवट झालेली प्रक्रिया पूर्ण करायची की नाही याबाबत संदिग्धता आहे.’

 

सेलिब्रिटींकडून ‘सरोगसी’ची चैन

नवी दिल्ली : एक नव्हे, तर दोन दोन जैविक अपत्ये असणाऱ्या काही बडय़ा सेलिब्रेटींनी सरोगसी तंत्रज्ञानाचा गैरवापर केला असल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी ठेवला. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते आमीर खान, शाहरुख खान आणि तुषार कपूर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला नाही; पण त्यांचा रोख या तिघांकडे होता.

केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगसी विधेयकाला दिलेल्या मंजुरीची घोषणा सुषमा स्वराज यांनी बुधवारी केली. त्या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदींचा उल्लेख करून त्यांनी चित्रपट अभिनेत्यांना धारेवर धरले. आमीर खान आणि त्याची द्वितीय पत्नी किरण राव यांनी २०११मध्ये सरोगसीद्वारे आझादला जन्म दिला आहे. शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनीही २०१३मध्ये सरोगसीद्वारे अबरामला जन्म दिला होता. तुषार कपूरने तर लग्न न करताच  ‘सरोगसी’द्वारे नुकतीच अपत्यप्राप्ती केली आहे. सुषमांचा रोख या तिघांकडे होता. यापूर्वी जैविक अपत्य (बायोलॉजिकल बेबी) असतानाही काही अभिनेत्यांनी सरोगसीचा वापर केला आहे. नि:पुत्रिकांसाठी सुविधा असलेली ‘सरोगसी’ आता काही बडय़ा अभिनेत्यांची चैन झाल्याचे टोकदार विधान त्यांनी केले. या विधेयकाने, यापूर्वी अपत्य असलेल्या जोडप्यांना सरोगसीचा पर्याय नाकारलेला आहे.

‘हे तर संस्कृतीविरोधात..’

समलैंगिक जोडप्यांनाही सरोगसीचा पर्याय नाकारल्याबद्दल छेडले असता स्वराज म्हणाल्या, ‘अशी परवानगी देणे तुम्हाला (पत्रकारांना) कदाचित आधुनिक विचारसरणीचे वाटेल, पण आमच्या दृष्टिकोनातून ते देशाच्या संस्कृती, परंपरेविरोधात आहे.’ समलैंगिक संकल्पनेला भारतात अद्यापही कायदेशीर नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘समलैंगिकतेला कायद्याने मान्यता दिली असताना सरोगसीसाठी कशी परवानगी देता येईल?’ असेही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या.