सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांच्यावरील सर्व आरोप आणि त्यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. डॉ. संपदा जोशी यांचे विद्यापीठाने निलंबन केले होते. परीक्षांचे उशिरा जाहीर होणारे निकाल, परीक्षा विभागातील गोंधळ यांसाठी डॉ. जोशी यांना विद्यापीठाने जबाबदार ठरवले होते. घाटोळ समितीच्या अंतरिम अहवालाच्या आधारे विद्यापीठाने डॉ. जोशी यांचे निलंबन केले होते. जोशी यांनी विद्यापीठ प्रशासनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणी सुरू असताना २५ ऑगस्टला त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
जोशी यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यानुसार त्यांच्यावरील सर्व आरोप आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत  कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी या निकालाबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.