21 September 2020

News Flash

सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड कायम

लायगुडे रुग्णालयातील स्वॅब सेंटर बंदच; पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्रात मर्यादित चाचण्या

लायगुडे रुग्णालयातील स्वॅब सेंटर बंदच; पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्रात मर्यादित चाचण्या

पुणे : धायरी येथील लायगुडे रुग्णालयातील स्वॅब चाचणी केंद्र तातडीने सुरू करण्याची सूचना आरोग्य विभागाने दिलेली असतानाही क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वॅब चाचणी केंद्र बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील रुग्णांना स्वॅब तपासणीसाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्रात जावे लागत आहे, मात्र येथे मर्यादितच चाचण्या होत आहेत.  पु.ल.देशपांडे उद्यानातील केंद्रात गुरुवारी सकाळी केवळ दहा चाचण्या करण्यात आल्या. स्वॅब तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना परत पाठविण्यात आले. या अनागोंदी कारभाराचा फटका सिंहगड रस्ता परिसरातील शेकडो रुग्णांना बसत असून रुग्णांची हेळसांड कायम राहिल्याचे चित्र आहे.

सिंहगड रस्ता परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सनसिटी, हिंगणे, वडगांव धायरी, आनंदनगर, माणिकबाग, धायरी परिसरातील संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्याची सुविधा महापालिकेकडून लायगुडे रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली होती. येथे दिवसाला सरासरी शंभराहून अधिक संशयित व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने घेतले जात असतानाच सोमवारपासून ( ७ सप्टेंबर) केंद्र अचानक बंद करण्यात आले होते. लायगुडे रुग्णालयातील ही सुविधा बंद करताना संशयित रुग्णांनी स्वॅब तपासणीसाठी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे रुग्णालयात जावे, असा आदेश सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आला होता. त्याचा फटका शेकडो रुग्णांना बसला होता. रुग्णांच्या नातेवाइकांकडून त्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. आयुक्त विक्रम कु मार यांनीही केंद्र तातडीने सुरू करण्याची सूचना आरोग्य खात्याला केल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले होते. मात्र आयुक्तांच्या आदेशाला आरोग्य विभागातील आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. आदेशानंतरही केंद्र बंदच ठेवण्यात आल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभारही यानिमित्ताने पुढे आला आहे.

लायगुडे रुग्णालयात कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे घशातील स्राव चाचणी केंद्र बंद करण्यात आले होते. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. हे केंद्र येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णालयातील प्राणवायू यंत्रणाही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून करोना काळजी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

— डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभाग प्रमुख, महापालिका

सारे काही खासगीकरणासाठी..

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून लायगुडे रुग्णालयात करोना काळजी केंद्र, घशातील स्राव चाचणी सुविधा देण्यात आली. मात्र रुग्णालयाचे खासगीकरण करण्यासाठी येथील कर्मचारी वर्ग क्षेत्रीय कार्यालय आणि विभागीय वैद्यकीय खात्याकडून स्थलांतरित करण्यात आला असल्याचे समोर आले होते. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करून स्वॅब केंद्रही बंद करण्यात आले होते. कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या रुग्णालयात सुविधा देण्याऐवजी त्याच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे ‘लोकसत्ता’ने उजेडात आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:52 am

Web Title: swab testing center at laigude hospital closed zws 70
Next Stories
1 विजय चित्रपटगृह लवकरच काळाच्या पडद्याआड
2 Coronavirus : अशी वेळ शत्रूवरही येऊ  नये
3 उपचारांमधील विलंबच ठरतोय मृत्यूचे कारण
Just Now!
X